कृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडी

कडेपूरमध्ये स्वाभिमानीचा चक्काजाम; चार कारखान्यांची शंभर ऊस वाहने रोखली! ऊसदराच्या आंदोलनाची कडेगाव तालुक्यात ठिणगी; दराचा प्रश्न सुटेपर्यंत ऊसतोड सुरू होऊ देणार नाही, संघटनेचा इशारा

कडेपूरमध्ये स्वाभिमानीचा चक्काजाम; चार कारखान्यांची शंभर ऊस वाहने रोखली!

ऊसदराच्या आंदोलनाची कडेगाव तालुक्यात ठिणगी; दराचा प्रश्न सुटेपर्यंत ऊसतोड सुरू होऊ देणार नाही, संघटनेचा इशारा

सिंहवाणी ब्युरो | अमित डोळ, कडेगाव
ऊसदराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, कडेपूर (ता. कडेगाव) येथे जुन्या सातारा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करून सोनहिरा, क्रांती, उदगिरी आणि जयवंत शुगर्स या चार साखर कारखान्यांची ऊस वाहतूक करणारी सुमारे शंभर वाहने रोखण्यात आली. या आंदोलनामुळे कडेगाव तालुक्यात ऊसदराच्या लढ्याची ठिणगी पडली असून, आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा आणि केंद्र सरकारने प्रतिटन पाचशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ऊसाला समाधानकारक दर मिळावा, यासाठी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

*दराचा प्रश्न सुटेपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा इशारा!

ऊसदराच्या मागणीकडे साखर कारखानदार आणि सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत ऊसतोड सुरू होऊ देणार नाही, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आणि ऊस वाहतुकीचा प्रश्न आगामी काळात अधिक तापण्याची शक्यता आहे.

आंदोलकांकडून वाहनचालकांची काळजी

आंदोलनादरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना पाणी, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती. ऊसदराच्या प्रश्नावर संघर्ष सुरू असतानाही वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी आंदोलकांनी घेतली.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इम्रान पटेल यांनी ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊसतोड देऊ नये, असे आवाहन केले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कडेगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, इम्रान पटेल यांच्यासह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

**ऊसदराच्या मागणीवर तोडगा निघणार की आंदोलनाची धग आणखी वाढणार, याकडे आता कडेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button