जिल्हाताज्या घडामोडी

कर्मवीर हिरे महाविद्यालयात ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा* ‘चले जाव चळवळ व भुदरगड तालुका’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन

*कर्मवीर हिरे महाविद्यालयात ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा*

चले जाव चळवळ व भुदरगड तालुका’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन

सिंहवाणी ब्युरो /गारगोटी :
कांतीच्या अमर ज्योतीला विनम्र अभिवादन करत कर्मवीर हिरे कला, विज्ञान, वाणिज्य व शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी येथे इतिहास विभागाच्या वतीने क्रांती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ‘चले जाव चळवळ व भुदरगड तालुका’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक व अर्थपूर्ण भित्तीपत्रिकेच्या अनावरणाने झाली. भित्तीपत्रिकेत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाविषयी कुतूहल व अभिमान निर्माण झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बी.ए. बी.एड. भाग–२च्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाला देशभक्तीपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. क्रांतीसिंह देसाई यांनी केले. त्यांनी क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करताना ९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला दिलेली निर्णायक दिशा अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. (डॉ.) युवराज देवाळे सर यांनी ‘चले जाव चळवळ व भुदरगड तालुका’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत व्याख्यान दिले. त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या व्यापक पार्श्वभूमीबरोबरच भुदरगड तालुक्यातील स्वातंत्र्य चळवळीचा सहभाग, स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि सामान्य जनतेने स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली भूमिका यावर प्रकाश टाकला. त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाचा राष्ट्रीय इतिहासाशी असलेला संबंध समजून घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. आर. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीच्या त्यागाचे स्मरण ठेवून विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये, लोकशाही, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यवंशी मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन इतिहास विभागप्रमुख प्रा आहेर सर आणि डॉ नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. क्रांतीसिंह देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. इतिहास विभागातील प्रा मोहिते सर, डॉ मोरे मॅडम, विद्यार्थी आणि महाविद्यालयातील विविध घटकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल महाविद्यालय प्रशासन तसेच मौनी विद्यापीठ प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.
इतिहासाच्या अभ्यासाला स्थानिक इतिहास, स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्रभक्तीची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.
“करेंगे या मरेंगे!” या भारत छोडो आंदोलनाच्या प्रेरणादायी घोषणेने कार्यक्रमाचा संदेश अधिक प्रभावी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button