जिल्हाताज्या घडामोडी

मंडपी धबधब्यात १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू तांबूळवाडीच्या महम्मद युसूफ शेखचा दुर्दैवी अंत; दुसऱ्या दिवशी शोधमोहीमेत सापडला मृतदेह

मंडपी धबधब्यात १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू
तांबूळवाडीच्या महम्मद युसूफ शेखचा दुर्दैवी अंत;

दुसऱ्या दिवशी शोधमोहीमेत सापडला मृतदेह

कडगाव / सिंहवाणी ब्युरो :
भुदरगड तालुक्यातील सवतकडा परिसरातील मंडपी धबधब्यात पोहण्यासाठी उतरलेल्या १७ वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. महम्मद युसूफ मेहबूब शेख (रा. तांबूळवाडी, ता. चंदगड) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अंधार व पावसामुळे शोधकार्य थांबवावे लागले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यानंतर युसूफचा मृतदेह शोधण्यात यश आले.
कुटुंबासह धबधबे पाहण्यासाठी आला होता
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तांबूळवाडी येथील मेहबूब शेख हे आपल्या कुटुंबातील १३ जणांसह नितवडे परिसरातील धबधबे पाहण्यासाठी आले होते. परिसरातील सहा धबधबे पाहिल्यानंतर सायंकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास ते सातव्या मंडपी धबधब्याजवळ पोहोचले.
यावेळी काही पर्यटक पाण्यात पोहत होते. त्यांच्यासोबत युसूफही पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. उपस्थितांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र खोल पाणी आणि वेगाने कोसळणाऱ्या धबधब्यामुळे बचावकार्याला अडथळे आले.
अंधारामुळे रात्री शोधमोहीम थांबली
घटनेची माहिती मिळताच योगेश कोळी, माजी सरपंच सर्जेराव पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. जीवरक्षक दिनकर कांबळे यांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, काळोख, पाऊस आणि धबधब्याचा वेग यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली.
सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे आणि वनक्षेत्रपाल अविनाश तायानक यांनी सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्याची माहिती दिली होती. त्यानुसार सकाळी शोधकार्य हाती घेतल्यानंतर युसूफचा मृतदेह पाण्यात सापडला.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. जीवनरक्षक दिनकर कांबळे व स्थानिक तरुणांनी धबधब्याच्या परिसरात शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर युसूफचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात त्यांना यश आले.
या वेळी श्री विलास काळे सहा.वनसंरक्षक
(खा. कु. तो. व वन्यजीव ) कोल्हापूर वन विभाग, कोल्हापूर
श्री अविनाश तायनाक, वनक्षेत्रपाल गारगोटी,
श्री राजेश चौगुले, वनक्षेत्रपाल कडगाव,
श्री विशाल पाटील वनक्षेत्रपाल,राधानगरी व वन्यजीव मानद रक्षक विजय पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.


या घटनेने तांबूळवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. युसूफच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.


कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक
युसूफ हा हलकर्णी येथे इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होता. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याची आई, वडील, आत्या, मामा-मामी, आजी-आजोबा यांच्यासह कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
युसूफच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

| वनविभागाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दोन वर्षांपूर्वीही याच ठिकाणी तरुणाचा बळी
मंडपी धबधब्याच्या याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी सूरज बाळासो मेने (रा. वेंगरूळ) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतरही धबधबा परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप कुटुंबीय आणि पर्यटकांनी केला आहे.
धोकादायक ठिकाणी सुरक्षारक्षक, जीवरक्षक, धोक्याच्या सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना असणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रशासनाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटनस्थळांवर कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button