जिल्हाताज्या घडामोडी

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसेचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा ‘सक्ती तातडीने थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन’चा इशारा

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसेचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

सक्ती तातडीने थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन’चा इशारा

गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात तसेच वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे शासन व महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भुदरगड तालुक्याच्या वतीने गुरुवारी गारगोटी येथील महावितरण कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर महावितरणचे उपअभियंता एस. के. राऊत यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आयोजित सभेत मनसेचे डॉ. युवराज येडुरे यांनी राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती नागरिकांवर अन्यायकारक असल्याचा आरोप केला. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी वाढीव व चुकीची वीज बिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तातडीने थांबवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
याशिवाय चुकीच्या व वाढीव वीज बिलांची स्वतंत्र चौकशी करून संबंधित ग्राहकांना तातडीने न्याय द्यावा, वीज ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे आणि महावितरणच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
डॉ. येडुरे यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी संबंधित या प्रश्नांवर शासनाने आणि महावितरण प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या निषेध मोर्चात राहुल पाटील, के. के. भारतीय, राहुल कुंभार, विश्वजित पाटील, प्रकाश पाटील, आकाश पाटील, सुशांत पाटील, संदीप पाटील, सचिन नलवडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चामुळे काही काळ महावितरण कार्यालय परिसरात घोषणाबाजी करण्यात आली. मात्र आंदोलन शांततेत पार पडले. निवेदन स्वीकारल्यानंतर उपअभियंता एस. के. राऊत यांनी संबंधित मागण्या वरिष्ठांकडे पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button