भुदरगडच्या सोनम मस्करची संघर्षातून ‘रौप्य’झेप! वडिलांनी लेकीसाठी जमीन-दुकान विकले; लेकीने देशासाठी रौप्य जिंकले

भुदरगडच्या सोनम मस्करची संघर्षातून ‘रौप्य’झेप!:
वडिलांनी लेकीसाठी जमीन-दुकान विकले; लेकीने देशासाठी रौप्य जिंकले
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
मुलीच्या हातात रायफल असावी आणि तिच्या डोळ्यांतले स्वप्न आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या लक्ष्यापर्यंत पोहोचावे, यासाठी वडिलांनी चक्क जमीन आणि दुकान विकले. आर्थिक संकटांनी कुटुंबाची परीक्षा घेतली; मात्र मुलीच्या स्वप्नापुढे परिस्थितीला झुकू न देणाऱ्या उत्तम मस्कर यांच्या त्यागाचे चीज करत पुष्पनगरच्या सोनमने भारतासाठी रौप्यपदक पटकावले.
भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर येथील नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकतालिकेत भर घालत रौप्यपदकाची कमाई केली. सोनमचे हे यश केवळ एका खेळाडूचे पदक नाही, तर त्यामागे वडिलांचा त्याग, आई-वडिलांचा विश्वास, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि सोनमची अथक मेहनत यांची प्रेरणादायी कहाणी आहे.
कोरोना काळात व्यवसायाला फटका
सोनमचे कुटुंब मूळचे पुष्पनगरचे. उदरनिर्वाहासाठी उत्तम मस्कर मुंबईला गेले. तेथे त्यांनी दूध व्यवसाय सुरू केला आणि कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाले. मात्र, २०२० मधील कोरोना महामारीमुळे दूध व्यवसायाला मोठा फटका बसला. आर्थिक परिस्थिती खालावल्याने कुटुंबाला मुंबई सोडून पुन्हा गावी परतावे लागले.
याच काळात सोनमच्या आयुष्याला नेमबाजीची दिशा मिळाली.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने स्वप्नाला आकार
कोल्हापूर येथील प्रशिक्षक रोहित हवालदार आणि राधिका बराले-हवालदार यांनी सोनमला नेमबाजीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अकादमीतील रायफल आणि साहित्याच्या मदतीने ती सराव करत होती.
मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी अत्याधुनिक रायफल आणि साहित्याची गरज होती. त्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता होती.
‘मुलीचे स्वप्न पैशाअभावी थांबता कामा नये,’ असा निर्धार करत उत्तम मस्कर यांनी गावाकडील जमीन आणि दुकान विकण्याचा निर्णय घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांतून २०२२ मध्ये सोनमसाठी पाच लाख रुपयांहून अधिक किमतीची रायफल व आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले.
प्रायोजकत्व अन् रेल्वेची नोकरी
सोनमच्या मेहनतीला यशाची साथ मिळत गेली. मे २०२३ मध्ये तिला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टकडून प्रायोजकत्व मिळाले. त्यानंतर तिला रेल्वेत नोकरीही मिळाली. त्यामुळे तिच्या क्रीडा कारकिर्दीला आर्थिक स्थैर्य मिळाले.
जागतिक स्पर्धांमध्येही पदकांची कमाई
सोनमने २०२३ मध्ये कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला. त्यानंतर २०२४ मध्ये कैरो येथील जागतिक स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले. दिल्लीतील जागतिक स्पर्धेतही तिच्या गळ्यात रौप्यपदक पडले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक १० मीटर एअर रायफल प्रकारात ६३४.१ गुणांची कामगिरी करत सोनमने संघातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. वैयक्तिक १० मीटर एअर रायफल प्रकारातही तिने अंतिम फेरी गाठत सहावे स्थान मिळवले.
आशियाई क्रीडा स्पर्धेची ‘चंदेरी’ सुरुवात
सोनम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदर्सा विनोद यांनी १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या पदकतालिकेत भर घालणाऱ्या या कामगिरीमुळे सोनमच्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय यशाची मोहोर मिळाली.
‘लेकीने आमच्या त्यागाचे सोने केले’
“२०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सोनमने सुवर्णपदक जिंकून देशाचे आणि आपल्या गावाचे नाव मोठे करावे. घरापासून दूर राहून तिने मोठे कष्ट घेतले. तिच्या या कष्टांचे, पालकांनी केलेल्या त्यागाचे आणि गुरूंनी दिलेल्या प्रशिक्षणाचे तिने खऱ्या अर्थाने सोने केले,” अशी भावना सोनमचे वडील उत्तम मस्कर यांनी व्यक्त केली.
जमीन विकून उभी केलेली रायफल… आणि त्या रायफलने देशासाठी मिळवून दिलेले रौप्य!
पुष्पनगरच्या सोनम मस्करची ही कहाणी भुदरगडच्या मातीतून देशाच्या क्रीडा विश्वापर्यंत पोहोचलेल्या जिद्द, संघर्ष आणि त्यागाची प्रेरणादायी गाथा ठरली आहे.ही बातमी
