क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाळूचा टेम्पो अडविल्याने पोलिसाला ५०० मीटर रस्त्यावर फरफटत नेले!:अंगावर टेम्पो घालण्याचाही प्रयत्न बेकायदा वाळू वाहतुकीची चौकशी करताना धक्कादायक प्रकार; दोघांना पहाटे घरातून अटक

वाळूचा टेम्पो अडविल्याने पोलिसाला ५०० मीटर रस्त्यावर फरफटत नेले!:अंगावर टेम्पो घालण्याचाही प्रयत्न

बेकायदा वाळू वाहतुकीची चौकशी करताना धक्कादायक प्रकार; दोघांना पहाटे घरातून अटक

सिंहवाणी ब्युरो / म्हसवड (जि. सातारा) :
बेकायदा वाळू वाहतुकीची चौकशी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला वाळूच्या टेम्पोसह तब्बल ४०० ते ५०० मीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना म्हसवड शहराच्या हद्दीत शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. या घटनेत पोलिस हवालदार महावीर कोकरे गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्या हाताला, पोटरीला, गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी कारवाई करत प्रीतम नवनाथ लोखंडे (रा. मल्हारनगर, म्हसवड) आणि अवी अशोक तोरणे (रा. म्हसवड, ता. माण) या दोघांना पहाटे त्यांच्या घरातून अटक केली आहे.

संशयास्पद टेम्पो थांबवला अन् प्रकाराला सुरुवात

हवालदार महावीर कोकरे हे शासकीय दुचाकीवरून संशयित वाहनांची तपासणी करत होते. यावेळी मेगासिटी ते बनगरवाडी-वीरकरवाडी मार्गावर विनानंबरचा दुधी रंगाचा टेम्पो संशयास्पदरीत्या जाताना त्यांच्या निदर्शनास आला.

कोकरे यांनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे आढळले. त्यांनी चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र, चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.

टेम्पो पळव’ सांगितले अन् पोलिसाला फरफटत नेले

पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच अवी तोरणे याने प्रीतम लोखंडे याला टेम्पो वेगाने पुढे नेण्यास सांगितल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर चालकाने टेम्पो भरधाव वेगाने पुढे नेला.

टेम्पो थांबविण्याच्या प्रयत्नात हवालदार कोकरे यांनी चालकाच्या बाजूच्या दरवाजाला पकडले. मात्र, टेम्पो न थांबवता पुढे नेण्यात आल्याने कोकरे यांना सुमारे ४०० ते ५०० मीटर रस्त्यावर फरफटत जावे लागले. काही अंतरानंतर त्यांचा हात सुटला आणि ते रस्त्यावर पडले.

रिव्हर्स घेऊन अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न

इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही. पोलिस कर्मचाऱ्याला रस्त्यावर पडलेले पाहून चालकाने टेम्पो पाठीमागे घेत त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र, कोकरे यांनी प्रसंगावधान राखत बाजूला होऊन स्वतःचा बचाव केला.

या घटनेत त्यांच्या हाताला, पोटरीला, गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली. घटनेनंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पहाटेच पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा शोध घेत दोघांनाही पहाटे त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. बेकायदा वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरच अशा प्रकारे हल्ल्यासदृश कृत्य झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेचा पुढील तपास म्हसवड पोलिस करीत आहेत.

— सिंहवाणी लाईव्ह न्यूज
संपादक : किशोर आबिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button