संघर्षातून रौप्यपदकापर्यंत… सोनम मस्करच्या यशाला पालकमंत्र्यांची दाद : ग्रामीण भागातील खेळाडूंना सुविधा मिळण्यासाठी मंत्रिमंडळात प्रश्न मांडणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

संघर्षातून रौप्यपदकापर्यंत… सोनम मस्करच्या यशाला पालकमंत्र्यांची दाद
ग्रामीण भागातील खेळाडूंना सुविधा मिळण्यासाठी मंत्रिमंडळात प्रश्न मांडणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
सिंहवाणी ब्युरो / पुष्पनगर :
पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील कन्या सोनम उत्तम मस्कर हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून देत भुदरगडसह राधानगरी मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या सोनमच्या या यशाचे कौतुक करताना ग्रामीण खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे; मात्र त्यांना आवश्यक साधने व सुविधा उपलब्ध होत नाहीत. हा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुष्पनगर येथे सोनमचे वडील उत्तम मस्कर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सोनमच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. यावेळी ते बोलत होते.
आईच्या एका वाक्याने बदलले सोनमचे आयुष्य
सोनमला लहानपणापासूनच बुद्धिबळाची आवड होती. २०१८ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने अंधेरी येथील तोलानी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात धनुर्विद्या आणि नेमबाजीचे प्रकार असल्याचे तिने आईला सांगितले. त्यावेळी ‘तुला आवडेल तो खेळ निवड’, असा आईने दिलेला सल्ला सोनमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला.
नेमबाजीची निवड केल्यानंतर सोनमने सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या खेळात प्रगती केली. सुरुवातीला ग्रामीण भागातील खेळाडूसमोर असलेल्या साधनसुविधांच्या मर्यादा होत्या; मात्र कुटुंबाने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत तिच्या स्वप्नाला बळ दिले.
ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, खेलो इंडियाचे पाठबळ
सोनमच्या कामगिरीची दखल घेत २०२३ मध्ये तिला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आणि खेलो इंडिया यांचे प्रायोजकत्व मिळाले. त्यानंतर तिच्या प्रशिक्षणाला आणि क्रीडा कारकिर्दीला अधिक बळ मिळाले. २०२४ मध्ये तिला रेल्वेत नोकरी मिळाली.
सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर सोनमने आतापर्यंत ५ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ८ पदके आपल्या नावावर केली आहेत. आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदकामुळे तिच्या यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.
‘लेकीने’ वडिलांचे ऋण फेडले
सोनमच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोठा त्याग आहे. मुलीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी तिच्या वडिलांनी जमीन आणि दुकान विकून तिच्या क्रीडा कारकिर्दीसाठी आर्थिक पाठबळ दिले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलीच्या स्वप्नावरचा विश्वास त्यांनी कायम ठेवला.
पदक जिंकल्यानंतरही सोनम आपल्या संघर्षाची आणि कुटुंबाच्या त्यागाची जाणीव विसरली नाही. १३ सप्टेंबर २०२६ रोजी तिने आपल्या कर्तृत्वाच्या कमाईतून वडिलांना चारचाकी वाहन भेट देत त्यांच्या त्यागाला कृतज्ञतेची सलामी दिली. ज्या वडिलांनी लेकीच्या स्वप्नासाठी आपली जमीन आणि दुकान विकले, त्याच वडिलांच्या हातात लेकीने चारचाकीची चावी ठेवली, हा क्षण मस्कर कुटुंबासाठी भावनिक आणि अभिमानाचा ठरला.
ग्रामीण गुणवत्तेला सुविधांची जोड गरजेची
सोनमच्या यशातून ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रातील असलेली गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गावाकडील अनेक मुला-मुलींमध्ये मोठी क्षमता असूनही प्रशिक्षण, आधुनिक साहित्य, मैदान, प्रशिक्षक आणि आर्थिक मदतीअभावी त्यांना संधी मिळत नाही. सोनमसारख्या खेळाडूंचा संघर्ष लक्षात घेऊन ग्रामीण भागातील क्रीडा सुविधा मजबूत करण्याची गरज आहे.
सोनमने मिळवलेले रौप्यपदक हे केवळ एका खेळाडूचे यश नसून, कुटुंबाचा त्याग, जिद्द, मेहनत आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेचा विजय आहे. सोनमच्या या यशामुळे पुष्पनगरसह संपूर्ण भुदरगड तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
