जिल्हाताज्या घडामोडी

करडवाडीत आरोग्य उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार: जिल्हा परिषद आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांची ग्वाही

करडवाडीत आरोग्य उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार:

जिल्हा परिषद आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांची ग्वाही

सिंहवाणी ब्युरो / प्रकाश खतकर, करडवाडी
करडवाडी : पारदेवाडी, निष्णप, कुंभारवाडी, पाचर्डे यांसह परिसरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या करडवाडी येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून प्रयत्न करणार, अशी ग्वाही जिल्हा परिषद आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी दिली.

करडवाडी येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित महाआरतीला सारिका नांदेकर उपस्थित होत्या. यावेळी गावातील ‘एक गाव, एक गणपती’ या ४४ वर्षांच्या परंपरेचे त्यांनी कौतुक केले. या परंपरेमुळे गावातील एकोपा अधिक दृढ झाल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

यावेळी गणेश खतकर यांनी करडवाडी येथे आरोग्य उपकेंद्राची आवश्यकता असल्याचे सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. करडवाडी हे पाच गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून येथे तालुका संघ शाखा, केडीसीसी बँक शाखा, साखर कारखान्याचे शेतकी कार्यालय तसेच खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे आरोग्य उपकेंद्र झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

यावर बोलताना सारिका नांदेकर म्हणाल्या, “सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून करडवाडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सुविधा आवश्यक आहे.”

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी गावातील एकोप्याचे कौतुक करत ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपसरपंच सागर खतकर, डॉ. संजीवनी बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा खतकर, संजय बांदेकर, सदाशिव बेलेकर, संदेश जाधव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या महाआरतीस केडीसीसी बँकेचे संचालक रणजीत पाटील, मनसेचे नेते युवराज येडूरे, विश्वजीत जाधव तसेच तिरवडेच्या सरपंच शुभांगी जाधव यांनीही उपस्थिती लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button