जिल्हाताज्या घडामोडी

हिंगोलीत रविवारी ‘मद्यमुक्त दालन’चा प्रारंभ गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या व्यसनमुक्ती अभियानाला मिळणार नवे बळ

हिंगोलीत रविवारी ‘मद्यमुक्त दालन’चा प्रारंभ

गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या व्यसनमुक्ती अभियानाला मिळणार नवे बळ

हिंगोली / सिंहवाणी ब्युरो :
केंद्र शासनाच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत हिंगोली शहरातील जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या दालनात रविवार, दि. ९ ऑगस्टपासून विनामूल्य ‘मद्यमुक्त दालन’ सुरू होत आहे. दर रविवारी सकाळी १० वाजता येथे मद्यपीडित व्यक्तींसाठी समुपदेशन, अनुभवांची देवाणघेवाण आणि व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.


जगप्रसिद्ध अल्कोहोलिक्स ॲनोनिमस (Alcoholics Anonymous) या संस्थेच्या कार्यपद्धतीवर आधारित या उपक्रमाद्वारे मद्यासक्त व्यक्तींना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखविण्यात येणार आहे. मद्याच्या व्यसनामुळे विस्कळीत झालेल्या कुटुंबांना पुन्हा उभारी देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असून, सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे व छायाचित्रे पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या दालनाच्या स्थापनेसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी विशाल अग्रवाल यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी असावरी काळे यांना निवेदन सादर केले होते. या उपक्रमाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के आणि समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांचे सहकार्य लाभले आहे.
माजी व्यसनमुक्ती राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, प्रा. बी. डी. कदम, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ शांताताई भाले, ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे यांच्या प्रेरणेतून तसेच समतादूत मिलिंद आळणे यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यसेनानी व सर्वोदय विचारवंत दिवंगत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या व्यसनमुक्तीच्या राष्ट्रीय अभियानाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button