जिल्हाताज्या घडामोडी

उद्रेकाच्या तेलात भिजलेल्या वातीला ‘जेन-झी’ची चिंगारी! क्रांतीला योग्य दिशा देऊन भारताचे भवितव्य घडविण्याची गरज : डॉ. राजेंद्र कुंभार


उद्रेकाच्या तेलात भिजलेल्या वातीला ‘जेन-झी’ची चिंगारी!


क्रांतीला योग्य दिशा देऊन भारताचे भवितव्य घडविण्याची गरज : डॉ. राजेंद्र कुंभार

गारगोटीत कॉम्रेड दत्ता मोरे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा

गारगोटी / किशोर आबिटकर :
गेल्या काही वर्षांपासून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अतिरेकामुळे भारतीय समाजमन एका प्रकारच्या दबावाखाली असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत तेलात भिजलेल्या वातीला ज्याप्रमाणे एका चिंगारीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जंतर-मंतरवरील जेन-झीच्या आंदोलनाने समाजमनाला एक चिंगारी मिळाली आहे. या चिंगारीतून एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली असून, ही क्रांती योग्य दिशेने नेऊन देशाचे भवितव्य घडविण्यासाठी सर्व समाजघटकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले.
गारगोटी येथील शाहू वाचनालयाच्या सभागृहात कॉम्रेड दत्ता मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयंत कळके होते, तर माजी आमदार बजरंग अण्णा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.


दत्ता मोरे यांचे कार्य इतिहासात नोंदले जाईल
डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले की, कॉम्रेड दत्ता मोरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टकरी, शेतकरी, गरीब आणि मागास जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविला जावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले.
“कॉम्रेड दत्ता मोरे यांच्या कार्याची नोंद इतिहासात होईलच; मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी आपल्या कम्युनिस्ट विचारांशी असलेली नाळ तुटू दिली नाही, ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे,” असे डॉ. कुंभार यांनी नमूद केले.


सरकारला निर्भयपणे जाब विचारण्याची गरज
शेती, शिक्षण, युवकांना रोजगार आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांबाबत समाजातील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार असून, जनतेच्या प्रश्नांवर सरकारला निर्भयपणे जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाकडून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्याचे वारंवार सांगितले जाते; मात्र त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.


मंदिरांपेक्षा दर्जेदार शाळा आणि रुग्णालयांना प्राधान्य द्या
विकासाच्या प्राधान्यक्रमावर भाष्य करताना डॉ. कुंभार यांनी सरकारी शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज व्यक्त केली.
“मंदिरे आणि अनावश्यक महामार्ग उभारण्यापेक्षा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा आणि सर्वसामान्यांना चांगले उपचार मिळतील अशी सरकारी रुग्णालये उभारण्यावर भर दिला पाहिजे. तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण व आरोग्याच्या सुविधा प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमात डॉ. अर्जुन कुंभार यांनी उपस्थित पाहुण्यांची ओळख करून दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. जयंत कळके यांनी कॉम्रेड दत्ता मोरे यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेतला. कॉम्रेड राम कळंबेकर यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, नंदकुमार मोरे,भुदरगड काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. एस. माने, टी. बी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉम्रेड दत्ता मोरे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button