आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडी

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गारगोटीत विशेष शिबिर : २२० ज्येष्ठ नागरिकांनी व्याख्यानाचा घेतला लाभ; १२२ रुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गारगोटीत विशेष शिबिर

२२० ज्येष्ठ नागरिकांनी व्याख्यानाचा घेतला लाभ; १२२ रुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी, :
ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे, वृद्धावस्था निरोगी, आनंदी आणि सक्रिय व्हावी, या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पल्लवी तारळकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने झाली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या जीवनशैलीत ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याकडे कोणत्या पद्धतीने लक्ष द्यावे, नियमित तपासणी, योग्य आहार-विहार, व्यायाम, योग व मानसिक आरोग्याचे महत्त्व याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली.

शारीरिक-मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन

आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्य, तसेच निरोगी व आनंदी वृद्धावस्थेसाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. वय वाढल्यानंतर होणारे शारीरिक बदल स्वीकारताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि दैनंदिन जीवनात शारीरिक हालचाली कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सविता शेट्टी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार-विहाराचे महत्त्व स्पष्ट केले. वयानुसार आहारात आवश्यक बदल, योग्य आहाराची निवड आणि दैनंदिन जीवनशैली याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा एकूण २२० ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.

१२२ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणी शिबिरात एकूण १२२ ज्येष्ठ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यापैकी ६८ रुग्णांना आयुर्वेदिक उपचार देण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसह विविध आरोग्य समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. योग व ध्यानधारणेचे महत्त्वही यावेळी समजावून सांगण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तपासण्या करण्यात आल्या असून सर्व रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली.

१२ रुग्णांनी पंचकर्म सुविधेचा घेतला लाभ

शिबिरामध्ये आयुर्वेदिक उपचारांसोबतच पंचकर्म सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. एकूण १२ ज्येष्ठ रुग्णांनी पंचकर्म सुविधेचा लाभ घेतला. त्यामुळे आधुनिक वैद्यकीय तपासणीसोबत आयुर्वेदिक उपचार व योग-ध्यान यांचा समन्वय साधत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य

या व्याख्यान व आरोग्य शिबिरास उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. वृषाली खोत, डॉ. पद्मसिंह पाटील, डॉ. रसिका चौगुले, डॉ. काटोळे तसेच रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि स्टाफ उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी आरोग्य तपासणी, उपचार, आहार-विहाराविषयी मार्गदर्शन, योग-ध्यानाची माहिती तसेच आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने शिबिर उपयुक्त ठरले. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

सिंहवाणी लाईव्ह न्यूज | गारगोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button