दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा :ऑक्टोबर २०२६ परीक्षांसाठी विशेष सवलतीची मागणी; प्रा. जोतीराम सोरटे यांचे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा
ऑक्टोबर २०२६ परीक्षांसाठी विशेष सवलतीची मागणी;
प्रा. जोतीराम सोरटे यांचे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर–
महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त व टंचाईग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी नेट, सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा. जोतीराम बाबुराव सोरटे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पत्राद्वारे केली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांसह विद्यापीठ स्तरावरील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ परीक्षांसाठी परीक्षा अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. मात्र, अनेक ग्रामीण कुटुंबांना दुष्काळजन्य परिस्थितीचा आर्थिक फटका बसत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविणेही अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा शुल्क हा विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त आर्थिक भार ठरू शकतो. त्यामुळे विद्यापीठाने विशेष बाब म्हणून शुल्कमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सोरटे यांनी केली आहे.
भरलेले शुल्क परत करण्याचीही मागणी
शासनाने दुष्काळग्रस्त किंवा टंचाईग्रस्त म्हणून निश्चित केलेल्या तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क यापूर्वीच भरले आहे, त्यांचे शुल्क परत करण्यात यावे किंवा पुढील परीक्षेच्या शुल्कामध्ये त्याचे समायोजन करण्यात यावे, अशी पर्यायी मागणीही करण्यात आली आहे.
यामुळे आधीच शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळू शकतो. दुष्काळाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विद्यापीठाने संवेदनशील भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे सोरटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शासनाकडून आर्थिक भाराची प्रतिपूर्ती मिळवावी
परीक्षा शुल्कमाफीमुळे शिवाजी विद्यापीठावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाने हा भार स्वतःपुरता मर्यादित न ठेवता संबंधित शासन विभागाकडे प्रस्ताव सादर करून शुल्कमाफीपोटी होणाऱ्या आर्थिक नुकसानीची शासनाकडून प्रतिपूर्ती मिळवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे परीक्षा अर्ज भरणे, परीक्षा देणे किंवा पुढील शिक्षण सुरू ठेवणे कठीण होऊ नये, यासाठी विद्यापीठाने शासनाशी समन्वय साधून ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रा. सोरटे यांनी व्यक्त केली आहे.
“विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत”
“दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षेपासून वंचित राहावे लागू नये. त्यामुळे विद्यापीठाने मानवीय आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून या मागणीचा तातडीने विचार करून दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी द्यावी,” असे प्रा. जोतीराम सोरटे यांनी म्हटले आहे.
आता या मागणीवर शिवाजी विद्यापीठ प्रशासन कोणती भूमिका घेते आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शुल्कमाफीबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थी, पालक व शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.