आशियाई पदकविजेत्या सोनम मस्करचे भुदरगडमध्ये जल्लोषात स्वागत: गारगोटीपासून पुष्पनगरपर्यंत स्वागताची लाट;

आशियाई पदकविजेत्या सोनम मस्करचे भुदरगडमध्ये जल्लोषात स्वागत:
गारगोटीपासून पुष्पनगरपर्यंत स्वागताची लाट;
विमानतळावर सरपंच संघटनेतर्फे सत्कार, मोटारसायकल रॅलीने लेकीचे गावात आगमन
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर रायफल शूटिंगच्या सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या भुदरगडच्या लेकीचे, आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिचे रविवारी भुदरगड तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोल्हापूर विमानतळापासून गारगोटी आणि पुढे पुष्पनगरपर्यंत सोनमच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लेकीने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
रविवारी कोल्हापूर विमानतळावर सोनमचे आगमन होताच भुदरगड तालुका सरपंच संघटनेतर्फे तिचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सरपंचांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. ग्रामीण भागातून क्रीडा क्षेत्रात वाटचाल करत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणाऱ्या सोनमच्या कामगिरीचे यावेळी कौतुक करण्यात आले.
सोनमने मिळविलेल्या या यशामागे तिची अविरत मेहनत, सातत्य, कुटुंबीयांचे पाठबळ आणि वडिलांचा त्याग महत्त्वाचा आहे. आर्थिक अडचणी, मर्यादित सुविधा आणि विविध अडथळ्यांवर मात करत सोनमने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे तिच्या गळ्यात पडलेले रौप्यपदक हे केवळ एका खेळाडूच्या कर्तृत्वाचे प्रतीक नसून, तिच्या कुटुंबाच्या संघर्षाचे आणि ग्रामीण भागातील जिद्दीचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
गारगोटीत जल्लोष; मोटारसायकल रॅलीने स्वागत
कोल्हापूर विमानतळावरील सत्कारानंतर सोनमचे गारगोटी येथे सायंकाळी सातच्या सुमारास आगमन झाले. गारगोटी प्रवेशद्वारावर केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी सोनमला पुष्पहार घालून तिचे स्वागत केले. त्यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅली क्रांतिज्योती येथे पोहोचल्यानंतर अभिवादन करण्यात आले. तेथून रॅली पुष्पनगरच्या दिशेने रवाना झाली.
गारगोटीपासून पुष्पनगरपर्यंत विविध गावांच्या वेशीवर सोनमचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पगुच्छ देत आणि जल्लोष करत तिच्या यशाचे कौतुक केले.
पुष्पनगरमध्ये लेकीची भव्य मिरवणूक
पुष्पनगरमध्ये पोहोचल्यानंतर सोनमची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भुदरगडचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आपल्या लेकीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोनमच्या यशामुळे गावासह संपूर्ण भुदरगड तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना सोनमची कामगिरी प्रेरणादायी ठरणार असून, मर्यादित साधनसुविधा असतानाही जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचता येते, हे सोनमने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. तिच्या यशामुळे भुदरगडच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, आगामी काळात तिने देशाचे प्रतिनिधित्व करत आणखी मोठी कामगिरी करावी, अशा शुभेच्छांचा वर्षाव यावेळी करण्यात आला.
यावेळी गारगोटीचे उपसरपंच भरत शेटके, अरुण शिंदे, राजू चिले, रुपाली राऊत, स्मिताराणी पिसे, प्रशांत भोई, रणधीर शिंदे, सुनील निंबाळकर, सभापती विक्रमसिंह पाटील, पी. के. कांबळे, शरद मोरे, बाजीराव चव्हाण, बी. डी. भोपळे, युवराज फगरे, विजय सारंग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुदरगड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वास्कर, शुभांगी जाधव, सुनिता पाटील, उपाध्यक्ष बाळ जाधव, रामदास देसाई, अरुण देसाई, राजेंद्र पाटील, प्रशांत देसाई, मारूती भराडे, कृष्णात मांडे, ऋषिकेश पाटील, निलम कोटकर, अनुराधा देसाई, ज्योती सुतार, अर्चना कांबळे आदींसह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
: भुदरगडच्या लेकीची आंतरराष्ट्रीय भरारी!
जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर रायफल शूटिंगच्या सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या सोनम मस्करचे कोल्हापूर विमानतळावर भुदरगड तालुका सरपंच संघटनेतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या सोनमच्या यशामुळे भुदरगडच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, तिची कामगिरी तालुक्यातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली आहे.