इयत्ता तिसरीपासून ICT विषय स्वतंत्रपणे शिकवा! दहावीच्या बोर्ड परीक्षेतही ICT विषय पूर्ववत सुरू करण्याची मागणी

इयत्ता तिसरीपासून ICT विषय स्वतंत्रपणे शिकवा!
दहावीच्या बोर्ड परीक्षेतही ICT विषय पूर्ववत सुरू करण्याची मागणी
सिंहवाणी ब्युरो / पुणे :
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणक व डिजिटल कौशल्यांचे भक्कम ज्ञान लहान वयापासून मिळावे, यासाठी नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) हा विषय इयत्ता तिसरीपासून स्वतंत्रपणे शिकविण्यात यावा, तसेच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी ICT विषय पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी ICT शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणेचे संचालक हेमंत वसेकर यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासूनच संगणक, डिजिटल साधने आणि माहिती-तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान मिळणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्याच्या दृष्टीने ICT विषयाला अभ्यासक्रमात स्वतंत्र स्थान मिळणे गरजेचे असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
तसेच माध्यमिक स्तरावर ICT विषयाला अधिक महत्त्व देऊन दहावीच्या बोर्ड परीक्षेत हा विषय पूर्ववत समाविष्ट करावा, अशीही मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना केवळ संगणक वापराचे ज्ञान न देता त्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि संगणक साक्षर करण्यासाठी अभ्यासक्रमात ICT ला योग्य स्थान मिळावे, अशी भूमिका संघटनेने मांडली.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे महानगरचे कार्यवाह विष्णू मोरे, ICT शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सुशांत लुगडे, सचिन पाटील, सचिव मनोज कांबळे, कविराज पाटील, किशोर यादव आणि अनुप रेडेकर उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना ICT विषयाला स्वतंत्र स्थान देण्याबरोबरच दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी हा विषय पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीचा शासनस्तरावर सकारात्मक विचार व्हावा, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.