क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाळूमामा देवस्थान जमीन गैरव्यवहाराच्या तपासाला वेग: ६०.७५ कोटींच्या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे सुरू: मुख्य संशयित अद्याप पसार

बाळूमामा देवस्थान जमीन गैरव्यवहाराच्या तपासाला वेग: ६०.७५ कोटींच्या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे सुरू:

मुख्य संशयित अद्याप पसार

बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या कारवाईला आता वेग आला आहे

 

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या कारवाईला आता वेग आला आहे. देवस्थानच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील कथित ११ कोटी ४३ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुख्य संशयित अद्याप पसार

या प्रकरणातील तत्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिणी खडके आणि देवस्थानचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. जिल्हा न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचे वृत्त आहे.

बुधवारी (२३ सप्टेंबर) रात्री एसआयटीने मुरगूड, निढोरी आणि आदमापूर परिसरातून पाच जणांना अटक केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. रुद्रभटे यांनी त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

अटक केलेले पाच जण

१. डॉ. भीष्म जोतीराम सूर्यवंशी-पाटील (३६), मुरगूड
२. सागर महादेव शिंदे (४२), मुरगूड
३. प्रकाश पांडुरंग मांगले (५७), मुरगूड
४. रणजितसिंह सुरेशराव सूर्यवंशी (५२), निढोरी, ता. कागल
५. तन्मय दत्तात्रय बाचणकर (२७), आदमापूर

जमीन व्यवहारातून कथित ११.४३ कोटींचा गैरव्यवहार

देवस्थान परिसरात पार्किंगसाठी जागेची गरज निर्माण झाल्यानंतर काही जमिनींची खरेदी करण्यात आली होती. तपासानुसार, काही जमीन व्यवहारांमध्ये मध्यस्थांनी मूळ मालकांकडून तुलनेने कमी दरात जमीन खरेदी करून काही दिवसांतच ती देवस्थानला मोठ्या रकमेत विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून सुमारे ११ कोटी ४३ लाख रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यवहारातील रकमा संशयितांच्या बँक खात्यांवर जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  मिळालेल्या माहिती नुसार , डॉ. भीष्म सूर्यवंशी यांच्या खात्यावर ४ कोटी ८८ लाख, सागर शिंदे यांच्या खात्यावर ९३ लाख ६१ हजार, प्रकाश मांगले यांच्या खात्यावर १ कोटी ६८ लाख, रणजित सूर्यवंशी यांच्या खात्यावर १ कोटी १२ लाख ३३ हजार आणि तन्मय बाचणकर यांच्या खात्यावर ३ कोटी ५१ लाख रुपये जमा झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले.

मात्र, अटक केलेल्या संशयितांच्या वकिलांनी सर्व व्यवहार बँक खात्यांमार्फत झाले असून त्याला अपहार म्हणणे योग्य नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला आहे. त्यामुळे या व्यवहारातील नेमकी जबाबदारी आणि पैशांचा प्रवाह तपासातून स्पष्ट होणार आहे.

६०.७५ कोटींच्या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे सुरू

मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीतील देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांबाबत ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा गुन्हा भुदरगड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून ऑगस्टमध्ये विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात आली होती.

जमीन व्यवहारातील तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून, आणखी काही व्यक्तींची भूमिका तपासात समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बाळूमामा देवस्थानच्या या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाकडे भाविक आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button