ताज्या घडामोडी

गारगोटी–कोल्हापूर अंतर अचानक ५० वरून ५५ किलोमीटर! : साईन बोर्डांवरील अंतरांच्या नोंदीत घोळ; वाहनधारकांवर पाच किलोमीटरचा अतिरिक्त प्रवासाचा भुर्दंड?

गारगोटी–कोल्हापूर अंतर अचानक ५० वरून ५५ किलोमीटर!

साईन बोर्डांवरील अंतरांच्या नोंदीत घोळ; वाहनधारकांवर पाच किलोमीटरचा अतिरिक्त प्रवासाचा भुर्दंड?

पाटगावच्या अंतरातही विसंगती; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांकडून चौकशीची मागणी

किशोर आबिटकर / गारगोटी :
शहरांचा विस्तार होत असताना दोन शहरांमधील अंतर कमी होत जाते, असा सामान्य अनुभव आहे. मात्र गारगोटी–कोल्हापूर मार्गावरील अंतर गेली अनेक दशके ५० किलोमीटर असताना नव्याने उभारण्यात आलेल्या साईन बोर्डवर ते ५५ किलोमीटर दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील अन्य साईन बोर्डांवरही काही ठिकाणांची वेगवेगळी अंतरे नमूद करण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गारगोटी–आजरा या सुमारे २४२ कोटी रुपये खर्चाच्या मार्गाचे काम सुरू असून त्यातील मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. गारगोटी शहरातून गडहिंग्लज मार्गाच्या ठिकाणापासून या मार्गाची सुरुवात होते. याच परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या एका दिशादर्शक फलकावर कोल्हापूर ५५ किलोमीटर, आंबोली ६९ किलोमीटर आणि सावंतवाडी १०० किलोमीटर अशी अंतरे नमूद करण्यात आली आहेत.

मात्र, गारगोटी–कोल्हापूर अंतर ५० किलोमीटर असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. मैलाचे दगड हटवून किलोमीटरचे दगड बसविण्यात आले, त्या काळापासून या मार्गावर कोल्हापूरचे अंतर ५० किलोमीटर दाखविले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अचानक हे अंतर ५५ किलोमीटर कसे झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुगलनुसार ५५ किलोमीटर’ असा खुलासा

या फलकावरील अंतर चुकीचे असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आले असता, कोल्हापूरचे अंतर गुगलनुसार ५५ किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले. तसेच, दुरुस्ती हवी असल्यास ती करून घेण्याचा सल्लाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मात्र, प्रश्न केवळ गुगलवरील अंतराचा नसून शासकीय निधीतून उभारण्यात येणाऱ्या मार्गावर अधिकृत साईन बोर्डवर कोणते अंतर प्रमाण मानले जाते आणि ते कोणत्या ठिकाणापासून मोजले जाते, हा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पूर्वी कोल्हापूर चावडी ते गारगोटी कचेरी या अंतराचा संदर्भ घेतला जात असल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. आता त्याच मार्गाचे अंतर ५० वरून ५५ किलोमीटर झाले असेल, तर त्यामागील मोजमापाची पद्धत कोणती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पाच किलोमीटरचा फरक; कोणाला फायदा, कोणाला भुर्दंड?

अंतरामध्ये पाच किलोमीटरची वाढ दाखविल्याने त्याचा परिणाम प्रवाशांबरोबरच वाहतूक व्यावसायिकांवर होणार आहे. काही वाहनधारक आणि वाहतूक व्यावसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले.

पूर्वी कोल्हापूरचे ५० किलोमीटरचे भाडे मिळत होते. आता ५५ किलोमीटर दाखविल्यामुळे पाच किलोमीटरचे अतिरिक्त भाडे मिळेल,’ अशी मिश्कील प्रतिक्रिया काही वाहतूक व्यावसायिकांनी व्यक्त केली.

दुसरीकडे, प्रवासी आणि खासगी वाहनधारकांकडून मात्र वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दराच्या पार्श्वभूमीवर ‘आधीच इंधनाचा खर्च वाढला आहे. त्यात पाच किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास कशासाठी?’ असा सवाल केला जात आहे.

एकाच परिसरात पाटगावचे अंतरही वेगवेगळे!

या प्रकाराला अधिक गंभीर बनवणारी बाब म्हणजे एकाच परिसरात पाटगावच्या अंतराचीही वेगवेगळी नोंद आढळून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

एका फलकावर पाटगाव ३२ किलोमीटर, तर त्याच परिसरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या फलकावर पाटगाव ३४ किलोमीटर असे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर एवढे मोठे नसताना दोन किलोमीटरचा फरक कसा पडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यामुळे साईन बोर्डवरील अंतरे कोणत्या ठिकाणापासून मोजण्यात आली आहेत? प्रत्येक फलकासाठी स्वतंत्र मोजमाप करण्यात आले आहे का? की जुन्या नोंदींवरूनच अंतरे टाकण्यात आली आहेत? याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आंबोली–सावंतवाडीच्या अंतरावरही प्रश्न

गारगोटी परिसरातून कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. तुलनेने जवळचा मार्ग म्हणून अनेक वाहनधारक या मार्गाचा वापर करतात.

मात्र नव्या फलकावर आंबोली ६९ आणि सावंतवाडी १०० किलोमीटर अशी अंतरे दाखविण्यात आली आहेत. ही अंतरे नेहमीच्या मार्गाच्या तुलनेत अधिक का दाखविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केल्यावर संबंधितांकडून गारगोटी–आजरा हा सिमेंट काँक्रीटचा मार्ग असून आजऱ्यापासून पुढे सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाचा विचार करून ही अंतरे देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मात्र, जर सध्याच्या मार्गानेही आजरा–आंबोली–सावंतवाडी असा प्रवास करता येत असेल, तर २४२ कोटी रुपयांच्या नव्या मार्गाच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असलेल्या कोकण व गोवा संपर्काच्या दृष्टीने नव्या मार्गावर प्रवाशांना अधिक अंतराचा संदेश देणारा फलक का उभारण्यात आला? असा सवालही उपस्थित होत आहे.

अधिकृत मोजमाप करून सर्व फलक दुरुस्त करण्याची मागणी

भुदरगड तालुक्यातील विविध मार्गांवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवरील गावांची अंतरे तपासण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. एकाच मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी एकाच गावाचे वेगवेगळे अंतर दाखविले जात असल्यास वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन—

गारगोटी–कोल्हापूर अंतराचे अधिकृत मोजमाप करावे,

पाटगावसह अन्य गावांची अंतरे पुन्हा तपासावीत,

सर्व साईन बोर्डवरील अंतरांमध्ये एकसमानता आणावी,

अंतरे कोणत्या ठिकाणापासून मोजली आहेत, याची स्पष्ट पद्धत निश्चित करावी,

चुकीची किंवा विसंगत माहिती असलेले फलक तातडीने दुरुस्त करावेत,

आणि सदर अंतरांमध्ये घोळ निर्माण होण्यामागे नेमके कारण काय आहे, याची चौकशी करावी,

अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शासकीय निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते उभारले जात असताना त्या रस्त्यांवरील दिशादर्शक फलकही अचूक, स्पष्ट आणि विश्वासार्ह असणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आता गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे वाहनधारक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button