जिल्हाताज्या घडामोडी

आयुर्वेद दिनानिमित्त गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन ‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद’ विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; ११० जणांचा सहभाग

आयुर्वेद दिनानिमित्त गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन:

स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद’ विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; ११० जणांचा सहभाग

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथील आयुष विभागातर्फे ११वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात आयुर्वेदाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि आजारांपासून बचावासाठी आरोग्यदायी सवयी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गडदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान धन्वंतरी पूजनाने करण्यात आली. यावेळी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

आयुर्वेदातील ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्’ या चिकित्सापद्धतीच्या मूलभूत तत्त्वांचा त्यांनी उहापोह केला. आजार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यदृष्टी, योग्य आहार-विहार आणि संतुलित जीवनशैलीचे महत्त्व    डॉ. स्नेहल कुलकर्णी   यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता शेट्टी यांनी प्रास्ताविक करताना आयुर्वेद चिकित्सापद्धतीची वैशिष्ट्ये व दैनंदिन जीवनातील तिचे महत्त्व सांगितले. डॉ. सतीश गडदे यांनी निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. बदलती जीवनशैली, आहाराच्या सवयी आणि आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचा सुमारे ११० नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगले, डॉ. सूरज पेडणेकर, डॉ. सलोनी देसाई, डॉ. वृषाली खोत यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. वृषाली खोत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button