जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मार्ट मीटरच्या सक्तीला भुदरगडमध्ये एल्गार! : “बळजबरी केली तर जशास तसे उत्तर देऊ”; कॉ. सम्राट मोरे यांचा महावितरणला इशारा

स्मार्ट मीटरच्या सक्तीला भुदरगडमध्ये एल्गार!

“बळजबरी केली तर जशास तसे उत्तर देऊ”; कॉ. सम्राट मोरे यांचा महावितरणला इशारा

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
स्मार्ट मीटर बसविण्यावरून गारगोटी शहरात निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता भुदरगड तालुक्यात उमटू लागले आहेत. “ग्राहकांची इच्छा नसताना स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. सक्ती केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा थेट इशारा कॉ. सम्राट मोरे यांनी महावितरणला दिला.

गारगोटी येथील महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटरच्या प्रश्नावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. मागील आठवड्यात स्मार्ट मीटर बसविण्यावरून कंपनीचे कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

“वीज ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. तिच्याशी संबंधित अधिकार कोणत्याही खासगी कंपनीच्या हातात जाऊ देता कामा नयेत. ग्राहकांना वाढीव बिलांचा आर्थिक भुर्दंड बसू नये आणि अचानक वीजपुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण होऊ नये,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

दरम्यान, वीज कायदा २००३ मधील तरतुदींचा आधार घेत ग्राहकांना मीटरबाबत कायदेशीर अधिकार असल्याचा दावा कॉ. मोरे यांनी केला. मात्र स्मार्ट मीटरची सक्ती करता येते किंवा नाही, याबाबत लागू नियम व नियामक आदेशांचा अंतिम अर्थ संबंधित प्राधिकरणाच्या चौकटीतच निश्चित होतो. विद्युत कायद्याच्या कलम ५५ मध्ये योग्य मीटरद्वारे वीजपुरवठ्याची तरतूद आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची आठवण; मग ही बळजबरी कशासाठी?

स्मार्ट मीटरबाबत विधानसभेत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य घरगुती ग्राहकांवर स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे सांगितल्याचे यापूर्वी वृत्तांत नमूद झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर महावितरणकडून ग्राहकांना मीटर बदलण्यासाठी संदेश व नोटिसा दिल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यामुळे “सरकारचे आश्वासन एकीकडे आणि प्रत्यक्षात सुरू असलेली मोहीम दुसरीकडे” अशी नाराजी ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.

“बळजबरीने बसविलेले मीटर पूर्ववत करा!”

मच्छिंद्र मुगडे यांनीही स्मार्ट मीटर बसविण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी सक्ती केली जाणार नसल्याची ग्वाही दिली असताना कंपनीमार्फत बळजबरीने मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा त्यांनी निषेध केला.

तर शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे यांनी,
“ज्या ग्राहकांच्या घरात बळजबरीने स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, ते पूर्ववत करून जुने मीटर बसवून द्यावेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल,” असा इशारा दिला.

या बैठकीस मा. जि. प. सदस्य राहुल देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, सरपंच सर्जेराव देसाई, गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, बाळासाहेब जाधव, अरुण देसाई, कॉ. राम कळंबेकर, मच्छिंद्र मुगडे, अविनाश शिंदे, भास्कर आबिटकर, सागर शिंदे, अविनाश तेली, जयवंत गोरे, स्वप्निल साळोखे, मानसिंग देसाई, राजेंद्र यादव, डी. एस. देसाई, भीमराव घुंगुरकर, संजय कळंबेकर, प्रकाश खोपडे, अभिजित देसाई यांच्यासह कार्यकारी अभियंता दत्तात्रय भरणे, उपकार्यकारी अभियंता एस. के. राऊळ, सहायक अभियंता विशाल नाटकर, विवेक मोरे आणि मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.

भुदरगडमध्ये स्मार्ट मीटरचा प्रश्न आता केवळ मीटर बदलण्यापुरता राहिलेला नसून ग्राहकांची संमती, बिलातील पारदर्शकता आणि महावितरणच्या कार्यपद्धतीवरून संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button