हुतात्म्यांच्या स्मृतीवर पाय ठेवून मिरवणुकीचा आनंद! पवित्र हुतात्मा स्मारकाच्या कठड्यावर चढून तरुणाईकडून मिरवणूक पाहण्याचा प्रकार; स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा विसर पडला का?

हुतात्म्यांच्या स्मृतीवर पाय ठेवून मिरवणुकीचा आनंद!
पवित्र हुतात्मा स्मारकाच्या कठड्यावर चढून तरुणाईकडून मिरवणूक पाहण्याचा प्रकार;
स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा विसर पडला का?
किशोर आबिटकर / गारगोटी :
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साह, जल्लोष आणि गर्दी असणे स्वाभाविक आहे. मात्र ज्या भूमीवर स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, त्याच हुतात्मा स्मारकाच्या पवित्र कठड्यावर चढून मिरवणूक पाहण्याचा प्रकार गारगोटीत घडल्याने संवेदनशील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गारगोटी शहरातील मुख्य हुतात्मा चौकात विसर्जन मिरवणुकीदरम्यान हजारोंची गर्दी झाली होती. मिरवणुकीतील आकर्षक देखावे, खेळ, डॉल्बी आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. मिरवणूक व्यवस्थित दिसावी म्हणून काही तरुणांनी थेट हुतात्मा स्मारकाभोवतीच्या कठड्यावर चढून गर्दीतून मिरवणूक पाहिली.
ज्या दगडांवर नावे आहेत, त्याच दगडांवर पाय?
या कठड्याभोवती 1942 च्या चलेजाव आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या सात हुतात्म्यांची नावे आणि माहिती कोरलेले सात स्मृतीदगड आहेत. गारगोटी कचेरीवरील हल्ल्याच्या स्वातंत्र्यलढ्यात या सात जणांनी बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या या स्मारकाला गारगोटीच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वर्षभर विविध राष्ट्रीय आणि महत्त्वाच्या प्रसंगी या स्मारकाला मानवंदना दिली जाते. मग त्याच स्मारकाच्या पवित्र कठड्यावर चढताना हुतात्म्यांच्या स्मृतीचा विचार का झाला नाही? असा सवाल जाणकार बुजुर्ग नागरिक उपस्थित करीत आहेत.
उत्सवाचा जल्लोष असावा; पण इतिहासाचा अपमान नको!
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक हा आनंदाचा आणि उत्साहाचा उत्सव आहे. मात्र उत्सवाचा उत्साह हुतात्म्यांच्या स्मृतीस्थळाच्या पावित्र्यावर मात करू नये, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
गारगोटीच्या मातीत स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सात हुतात्म्यांच्या नावांनी कोरलेल्या दगडांवर उभे राहून काहीजण मिरवणुकीचा आनंद घेत असतील, तर हा केवळ एक क्षणिक प्रकार म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा विषय नाही. तो आपल्या इतिहासाबद्दलच्या संवेदनशीलतेचा प्रश्न आहे.
हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त दिले; आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मानही जपू शकत नाही का?
उत्सव साजरा करा, जल्लोष करा; पण हुतात्म्यांच्या स्मारकाचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे!