जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

गोकुळ’ निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट; महायुतीचे ११, काँग्रेस आघाडीचे १० उमेदवार निश्चित!

‘गोकुळ’ निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट; महायुतीचे ११, काँग्रेस आघाडीचे १० उमेदवार निश्चित!

‘कप-बशी’ चिन्हासाठी दोन्ही आघाड्यांचा दावा; २१ उमेदवारांची नावे निवडणूक विभागाकडे
महायुतीत सर्व माजी संचालकांना संधी; काँग्रेस आघाडीत चार माजी, सहा नवीन चेहरे
उर्वरित २९ जागांवर कोणाला संधी? इच्छुकांची धाकधूक वाढली

सिंहवाणी ब्युरो /कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुती आणि काँग्रेस आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांनी आपल्या संभाव्य उमेदवारांच्या याद्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करून ‘कप-बशी’ हे समान चिन्ह मिळावे, अशी मागणी केली आहे. दोन्ही आघाड्यांकडून सादर करण्यात आलेल्या याद्यांमध्ये एकूण २१ उमेदवारांची नावे असून, उर्वरित २९ जागांसाठी कोणाला संधी मिळणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले असून छाननीनंतर उमेदवारीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर अंतिम पॅनेल आणि निवडणुकीचे खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ‘कप-बशी’ चिन्हासाठी दोन्ही प्रमुख गटांनी दावा केल्याने चिन्हाच्या निर्णयालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. ९ ऑक्टोबरला ‘कप-बशी’ चिन्हाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीच्या यादीत सर्व माजी संचालक

महायुतीने निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या यादीत ११ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व उमेदवारांना यापूर्वी ‘गोकुळ’च्या संचालक मंडळात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे अनुभवी संचालकांच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याची महायुतीची रणनीती असल्याचे या यादीवरून दिसून येते.

महायुतीचे संभाव्य उमेदवार :

राष्ट्रवादी काँग्रेस :

राजेश नरसिंग पाटील – चंदगड

नवीद मुश्रीफ – कागल

युवराज पाटील – कागल

अरुण डोंगळे – राधानगरी

बाळासाहेब खाडे – करवीर

रणजीतसिंह पाटील – भुदरगड

शिवसेना (शिंदे गट) :

विश्वास नारायण पाटील – करवीर

अजित नरके – पन्हाळा

जनसुराज्य :

अमरसिंह पाटील – पन्हाळा

कर्णसिंह गायकवाड – शाहूवाडी

भाजप :

अंबरीष घाटगे – कागल

महायुतीमध्ये जागावाटपाचा अंतिम तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे निवडणूक विभागाकडे संभाव्य उमेदवारांची यादी सादर केली असली, तरी अंतिम पॅनेलमध्ये काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीतील जागावाटप अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यापर्यंत निश्चित होण्याची शक्यता असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

काँग्रेस आघाडीत सहा नवीन चेहरे

दुसरीकडे काँग्रेस आघाडीने १० उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे चार अनुभवी माजी संचालकांसोबत सहा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न या आघाडीने केल्याचे दिसून येते.

काँग्रेस आघाडीचे संभाव्य उमेदवार :

शशिकांत पाटील-चुयेकर – करवीर

बाबासाहेब चौगले – करवीर

भीमगोंड बोरगावे – शिरोळ

विश्वजीत रणजीतसिंह पाटील – कागल

विश्वजीत दिनकरराव जाधव – भुदरगड

सचिन घोरपडे – भुदरगड

विशाल गोपाळराव पाटील – चंदगड

राजू जयवंतराव आवळे – हातकणंगले

बयाजी शेळके – गगनबावडा

अंजना रेडेकर – आजरा

दोन्ही आघाड्यांनी आपल्या संभाव्य उमेदवारांच्या स्वाक्षऱ्यांसह ‘कप-बशी’ चिन्हाची मागणी केली आहे. त्यामुळे एकाच चिन्हासाठी दोन प्रमुख पॅनेलमध्ये आता निवडणूक विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

उर्वरित २९ जागांवर कोण?

‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या ५० जागांपैकी २१ जागांसाठी संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आली असली, तरी उर्वरित २९ जागांबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे. दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याने उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.

विशेषतः महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य या घटकांमध्ये जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरविणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने स्वतंत्रपणे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करून शक्तिप्रदर्शन केले होते; त्यानंतर महायुतीतील समन्वयाचा मुद्दा चर्चेत आला.

काँग्रेस आघाडीकडेही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उर्वरित जागांसाठी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. उमेदवारी न मिळाल्यास काही इच्छुक बंडखोरीचा मार्ग स्वीकारणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

अर्जांची विक्रमी संख्या; अंतिम चित्र माघारीनंतर

यंदाच्या ‘गोकुळ’ निवडणुकीत विक्रमी नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. विविध राजकीय गट, संघटना आणि इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील स्पर्धेची तीव्रता स्पष्ट झाली आहे. छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज माघारीच्या टप्प्यात पॅनेलची प्रत्यक्ष रचना समोर येणार आहे.

दरम्यान, ‘गोकुळ’च्या २५ सदस्यीय संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राबरोबरच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुती आणि काँग्रेस आघाडी यांच्यातील थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारी आणि स्थानिक समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आता खरी उत्सुकता आहे ती उर्वरित २९ उमेदवारांची. कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार आणि कोण बंडखोरीचा झेंडा हाती घेणार, यावर ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे पुढील राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button