पैशांच्या वादातून पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्याचा खून: चार आरोपी अटकेत

पैशांच्या वादातून पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्याचा खून, चार आरोपी अटकेत
कुंभारीत दऱ्याप्पा काळे यांच्यावर कुऱ्हाड, फावडे, लोखंडी खोरे व बॅटने हल्ला;
सिंहवाणी ब्युरो | महेश गायकवाड, सोलापूर:
कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान पारधी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दऱ्याप्पा गंगाराम काळे (वय ६६, रा. पारधी कॅम्प, कुंभारी) यांच्या निर्घृण खुनात झाले. सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास स्वामी जय नारायण गुरुकुल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतवस्तीवर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी निलेश आडगळे, प्रकाश आडगळे, मुकेश आडगळे आणि श्रीदेवी आडगळे या चौघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दऱ्याप्पा काळे हे त्यांची मुलगी राजश्री साळुंखे यांच्यासोबत आरोपी निलेश आडगळे याच्या शेतातील वस्तीवर गेले होते. यावेळी पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी कुऱ्हाड, लोखंडी खोरे, फावडे आणि लाकडी बॅटने दऱ्याप्पा काळे यांच्यावर गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलीवरही लोखंडी हत्याराने मारहाण करण्यात आल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
या घटनेमुळे कुंभारी परिसरासह दक्षिण सोलापूर तालुक्यात खळबळ उडाली असून, पारधी समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चार आरोपी अटकेत; हत्यारे जप्त
या प्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गु.र. नं. ५९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड, लोखंडी खोरे, फावडे, लाकडी बॅट आणि लोखंडी फुकारी जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांवर आरोप असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे तसेच वळसंग पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे तपास करीत आहेत. सपोनि डोंगरे आणि वळसंग पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन तातडीने कारवाई केली.
वळसंग हद्दीत तीन महिन्यांत तीन खून?
वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत खुनाच्या घटनांची मालिका घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन महिन्यांत या हद्दीत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. कुंभारी-दोड्डी रस्त्यावर महिलेचा खून, त्यानंतर वळसंग येथे सद्दाम अमलीचुंगे यांचा खून आणि आता कुंभारीतील सामाजिक कार्यकर्ते दऱ्याप्पा काळे यांचा खून झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.
कुंभारी-दोड्डी, वळसंग-आचेगाव तसेच हणमगाव-धोत्री रस्त्याच्या परिसरात अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. रामपूर परिसरातही बेकायदेशीर शिंदी विक्री होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, दबावामुळे अनेकजण उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचीही चर्चा आहे.
: दिवसा ढवळ्या खून; पोलिसांसमोर मोठे आव्हान
सद्दाम अमलीचुंगे यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच कुंभारी परिसरात सोमवारी सकाळी दऱ्याप्पा काळे यांचा खून झाला. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाने एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा जीव घेतल्याने परिसरात संतापाची भावना आहे.
वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर गुन्हे घडत असल्याची नागरिकांची भावना असून, अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालून कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सिंहवाणी लाईव्ह न्यूज | सोलापूर
निर्भीड • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता