क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

ऊसाच्या शेतात ‘गांजा’ची लागवड; अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई :१ कोटी ५ लाखाचाचा मुद्देमाल जप्त; २४० झाडे आढळली, २११ किलो वजन

ऊसाच्या शेतात ‘गांजा’ची लागवड; अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई

१ कोटी ५ लाखाचाचा मुद्देमाल जप्त; २४० झाडे आढळली, २११ किलो वजन

सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड | सोलापूर
अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मोठी कारवाई करत मौजे आळगी (ता. अक्कलकोट) येथील ऊसाच्या शेतातून गांजा सदृश्य वनस्पतीची २४० झाडे जप्त केली. जप्त मुद्देमालाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असून, त्याची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, २४० झाडांपैकी २१० झाडे जिवंत तर ३० झाडे वाळलेली होती. काही झाडांची उंची तब्बल १२ फुटांपर्यंत असल्याचे समोर आले आहे.

गोपनीय माहितीवरून शेतावर छापा

दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी दूरक्षेत्रात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी आळगी येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित शेताची पाहणी केली.

ऊसाच्या आड गांजाची झाडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) यांच्या ऊसाच्या शेतात ठिकठिकाणी गांजा सदृश्य मोठी झाडे आढळून आली. पंचनामा करून ही झाडे जप्त करण्यात आली.

या कारवाईत २४० झाडे आणि २११ किलो १०० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ₹१,०५,५५,००० असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अन्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे यांच्यासह अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सिंहवाणी लाईव्ह न्यूज
संपादक : किशोर आबिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button