जिल्हाताज्या घडामोडी

विकसित कोल्हापूर २०४७साठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ची राज्यपालांकडे भूमिका : रेल्वे, पर्यटन, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा व्यापक आराखडा मांडला

विकसित कोल्हापूर २०४७साठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ची राज्यपालांकडे भूमिका

रेल्वे, पर्यटन, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा व्यापक आराखडा मांडला

कोल्हापूर / जिमका :
कोल्हापूरच्या सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजित विकासाला गती देण्यासाठी कार्यरत असलेल्या **‘कोल्हापूर फर्स्ट’**च्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांची भेट घेऊन ‘विकसित कोल्हापूर २०४७’ या विकासदृष्टीची माहिती दिली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करत आधुनिक सुविधा, उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांनी सक्षम शहर व जिल्हा घडविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

‘कोल्हापूर फर्स्ट’चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी व्यासपीठाच्या स्थापनेपासून राबविण्यात येत असलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची तसेच शासनाच्या विविध स्तरांवर सुरू असलेल्या समन्वयात्मक पाठपुराव्याची माहिती राज्यपालांना दिली.

विकासासाठी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा

कोल्हापूरचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक महत्त्व कायम ठेवून आधुनिक व भविष्यवेधी विकास साधण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. शिक्षण, कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती, उद्योग, पर्यटन आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन नियोजनाची गरज अधोरेखित करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला गती देणे, कोल्हापूर-सांगली-सातारा-कोकण या भागांचा समावेश असलेले पर्यटन सर्किट PRASAD योजनेअंतर्गत विकसित करणे, तसेच कोल्हापूरला गुंतवणुकीसाठी सक्षम औद्योगिक केंद्र बनविण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

याशिवाय कोल्हापूर-सांगली-सातारा फाउंड्री, इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग हब, शहरातील वाहतूक व्यवस्था व रस्ते सुविधांचे आधुनिकीकरण आणि कोल्हापूर-सांगली-इचलकरंजी औद्योगिक व नागरी पट्ट्याचा एकात्मिक विकास या विषयांवरही भर देण्यात आला.

वारसा आणि आधुनिक विकासाचा समन्वय

भेटीदरम्यान ‘कोल्हापूर फर्स्ट’तर्फे कोल्हापूरच्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी विशेष फोटो फ्रेम तसेच विकासविषयक निवेदन राज्यपालांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक विकासाची सांगड घालण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला. शासन, उद्योगक्षेत्र आणि समाज यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून कोल्हापूरच्या दीर्घकालीन विकासाला गती देण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, स्मॅकचे उपाध्यक्ष भरत जाधव, डी. वाय. पाटील ग्रुपचे चेअरमन संजय डी. पाटील, उद्योजक नीरज झंवर, राजीव पाटील, अजय कोराने आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंहवाणी लाईव्ह न्यूज |
संपादक किशोर आबिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button