गारगोटी हायस्कूलमध्ये नवरात्रोत्सवाचा सांस्कृतिक जल्लोष! : विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचे आकर्षक दर्शन : छत्रपती शिवराय व मावळ्यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष

गारगोटी हायस्कूलमध्ये नवरात्रोत्सवाचा सांस्कृतिक जल्लोष! :
विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचे आकर्षक दर्शन
छत्रपती शिवराय व मावळ्यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, गारगोटी येथे नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया नृत्य, लेझीम आणि पारंपरिक वेशभूषेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशातील विविध राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडविले. वारकरी, केरळी, राजस्थानी आणि गुजराती वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने कार्यक्रमात विशेष रंगत आली.
भारतीय संस्कृती, परंपरा, लोककला आणि सण-उत्सवांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राज्यांच्या पारंपरिक पोशाखांतून तेथील संस्कृती, राहणीमान आणि परंपरांचे दर्शन घडले. भारताच्या ‘विविधतेत एकता’ या वैशिष्ट्याचा प्रत्यय या उपक्रमातून आला.
दांडियाच्या तालावर विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरला, तर लेझीमच्या जोशपूर्ण सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडले. वारकरी वेशभूषेतून भक्तीपरंपरेचा, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेतून महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा जागर करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि लोककलांच्या सुरेख संगमामुळे शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
संस्कृतीचे जतन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या विविध सांस्कृतिक परंपरांची ओळख व्हावी, त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता, सांघिक भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
या कार्यक्रमास प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, आर. पी. गव्हाणकर, पी. पी. भंडारी, युवराज शिगावकर, सौ. सुनीता पाटील, बी. के. इंगळे, धीरज मेंगाणे, प्रा. शेखर देसाई, प्रा. सौ. रोहिणी निकम, प्रा. सौ. स्नेहा साळोखे, सौ. एल. आर. पाळेकर, विद्याधर परीट, श्री. संतोष पाटील, सौ. सुजाता पाटील, ऋषिकेश गव्हाणकर, श्रेया घोडके, विजय स्मार्त, नामदेव शिंदे, सौ. मंगल कांबळे, विश्वास केणे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.