ताज्या घडामोडी

कोल्हापुरात हिट अँड रनचा थरार! भरधाव इलेक्ट्रिक कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

कोल्हापुरात हिट अँड रनचा थरार! भरधाव इलेक्ट्रिक कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचा आरोप; अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन, राजारामपुरी पोलिसांची कारवाई

सिंहवाणी विशेष | कोल्हापूर
कोल्हापूर शहरात हिट अँड रनच्या भीषण घटनेने खळबळ उडाली आहे. शिवाजी विद्यापीठ परिसर ते शाहू टोल नाका मार्गावर रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) मध्यरात्री भरधाव इलेक्ट्रिक कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात उमेश विलास पाथरूट (वय ३२) आणि गणेश सुनील पाथरूट (वय ३४) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचे पुत्र पद्मसिंह रणजितसिंह पाटील (वय ३६) यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास उमेश आणि गणेश हे दोघे दुचाकीवरून शाहू टोल नाका परिसरात गेले होते. त्याचवेळी भरधाव इलेक्ट्रिक कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मद्यप्राशनाचा आरोप; चालकाला अटक

या अपघातातील कार पद्मसिंह पाटील चालवत असल्याचे तपासात समोर आले. चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचा आरोप असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन कुटुंबांचा आधार हरपला!

उमेश आणि गणेश हे दोघेही मूर्ती घडविण्याचे व दगडावर नक्षीकाम करण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात लहान मुले, पत्नी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. दोन कुटुंबांचा आधार असलेल्या या तरुणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघात की बेफिकीर वाहनचालकांची जीवघेणी वृत्ती?

दारू पिऊन वाहन चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे आणि अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून निघून जाणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? दोन तरुणांचा जीव गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना न्याय आणि योग्य नुकसानभरपाई मिळणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत.

✍️ *संपादक : किशोर आबिटकर*
*सिंहवाणी लाईव्ह न्यूज*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button