क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुर येथे विवाहितेचा मृत्यू; परिसरात हळहळ मध्यरात्री राहत्या घरात आढळल्या बेशुद्ध अवस्थेत; उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट

कुर येथे विवाहितेचा मृत्यू; परिसरात हळहळ

मध्यरात्री राहत्या घरात आढळल्या बेशुद्ध अवस्थेत; उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट

सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
भुदरगड तालुक्यातील कुर येथे एका ३३ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २१) मध्यरात्री उघडकीस आली. शोभा संतोष राजगिरे (वय ३३, रा. कुर, ता. भुदरगड) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे कुर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलाच्या निदर्शनास आल्यानंतर घटना उघडकीस

भुदरगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शोभा राजगिरे यांचे पती एमआयडीसीमध्ये नोकरीला असल्याने ते रात्री कामावर गेले होते. दरम्यान, घरात झोपलेल्या मुलाला आई अंथरुणात नसल्याचे लक्षात आले. त्याने दिवा लावून पाहिले असता आई गंभीर अवस्थेत आढळून आली.

त्यानंतर मुलाने नातेवाईकांना व स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती दिली. नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने मदत करून शोभा यांना गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

भुदरगड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती मिळताच भुदरगड पोलिसांनी नोंद घेतली आहे. याप्रकरणी नामदेव सात्ताप्पा चौगले (रा. मडिलगे खुर्द, ता. भुदरगड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शोभा राजगिरे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भुदरगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शोभा राजगिरे यांच्या पश्चात पती, सासू, मुलगा व दीर असा परिवार आहे. एका कुटुंबातील महिलेच्या अशा आकस्मिक मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button