राजश्री कुलकर्णी यांचा मृत्यू की घातपात? भावाचा गंभीर आरोप; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी! धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांकडे धाव

राजश्री कुलकर्णी यांचा मृत्यू की घातपात? भावाचा गंभीर आरोप; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!
अवघ्या अर्ध्या तासापूर्वी भाच्याशी व्यवस्थित संवाद; त्यानंतर अचानक मृत्यू कसा? नातेवाईकांचा संशय, धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांकडे धाव
सिंहवाणी ब्युरो | महेश गायकवाड | सोलापूर
धाराशिव येथील सौ. राजश्री संतोष कुलकर्णी यांच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. राजश्री यांचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर संशय व्यक्त करत त्यांच्या भावाने थेट धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. पती संतोष सूर्यकांत कुलकर्णी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सखोल तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मृत राजश्री कुलकर्णी यांचे भाऊ उदयकुमार नंदकुमार शामराज (रा. आर्य चौक, रावळ गल्ली, तुळजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजश्री यांचा विवाह संतोष सूर्यकांत कुलकर्णी यांच्याशी झाला होता. विवाहानंतर पतीचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा तसेच तो बाहेरख्याली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या कारणावरून राजश्री यांना सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचेही अर्जात नमूद आहे.
विशेष म्हणजे, मागील एक वर्षापासून राजश्री या पतीसोबत नांदण्यास आल्या होत्या. मात्र, गेल्या महिन्याभरापासून तुळजापूर येथील स्वतःच्या मालकीचा प्लॉट विकून पैसे देण्यासाठी पतीकडून दबाव आणला जात होता. यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची माहिती राजश्री यांनी वेळोवेळी भावाला दिली होती, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक संशयास्पद बाब म्हणजे मृत्यूच्या काही वेळ आधी झालेला मोबाईलवरील संवाद. दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास राजश्री यांचा मुलगा वरद याच्या मोबाईलवरून त्यांचा भाचा कृष्णा उदयकुमार शामराज याने त्यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी राजश्री या नेहमीप्रमाणे व्यवस्थित बोलत होत्या, त्यांची मानसिक स्थितीही सामान्य होती, असा दावा त्यांच्या भावाने केला आहे.
मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात नेमके काय घडले? राजश्री यांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकरणी अर्जदाराने भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून), ८५ (पती किंवा नातेवाईकांकडून क्रूरता) तसेच तपासातून निष्पन्न होणाऱ्या अन्य योग्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसेच पती संतोष कुलकर्णी आणि मृत राजश्री यांचे मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासावेत, घटनास्थळाची पाहणी करून साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत, पुरावे नष्ट होण्यापूर्वी आवश्यक कारवाई करावी आणि संशयित पतीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात आनंदनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दिल्याचे अर्जात नमूद आहे. तक्रारीची प्रत पोलीस निरीक्षक, आनंदनगर पोलीस ठाणे यांनाही देण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई होते, शवविच्छेदन अहवालातून काय निष्पन्न होते आणि मृत्यूमागील सत्य काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष चौकट | अवघ्या अर्ध्या तासात नेमके काय घडले?
मृत राजश्री कुलकर्णी यांचे मृत्यूच्या केवळ अर्धा तास आधी भाचा कृष्णा याच्याशी मोबाईलवर व्यवस्थित आणि नेहमीप्रमाणे बोलणे झाले होते. त्यावेळी त्या पूर्णपणे सामान्य असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मग अवघ्या अर्ध्या तासात असे नेमके काय घडले की त्यांचा अचानक मृत्यू झाला?
हा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय नातेवाईक, शेजारी आणि संबंधित नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची केवळ औपचारिक चौकशी न करता प्रत्येक बाबीचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.
अर्ध्या तासातील घटनाक्रम, मोबाईल संभाषण, घटनास्थळावरील परिस्थिती आणि शवविच्छेदन अहवाल यांची सांगड घातल्याशिवाय या मृत्यूचे गूढ उकलणार नाही!
✍️ सिंहवाणी लाईव्ह न्यूज