तेरच्या धोंडाबाईंची करुण कहाणी; रेशन नाही, अनुदान नाही! अंधत्व, अपंगत्व आणि गरिबीशी झुंज; शासनाच्या मदतीची आर्त हाक! अंधारमय आयुष्य… पडकं घर… पोटात अन्नाचा घासही नाही!

तेरच्या धोंडाबाईंची करुण कहाणी; रेशन नाही, अनुदान नाही!
अंधत्व, अपंगत्व आणि गरिबीशी झुंज; शासनाच्या मदतीची आर्त हाक!
अंधारमय आयुष्य… पडकं घर… पोटात अन्नाचा घासही नाही!
तेरच्या धोंडाबाई गाडे यांची हृदयद्रावक कहाणी; डोळ्यांना दिसत नाही, पाय साथ देत नाहीत, मुलगाही भोळसर… शासनाच्या योजनांचा मात्र ठावठिकाणा नाही!
शासनाच्या योजना कागदावर, पण धोंडाबाईंच्या चुलीवर भाकरही नाही!
सिंहवाणी ब्युरो | धाराशिव (तेर) / महेश गायकवाड
तेर (जि. धाराशिव) : स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतो का, असा अस्वस्थ करणारा प्रश्न धाराशिव जिल्ह्यातील तेर गावातील धोंडाबाई गाडे यांच्या जगण्याने उपस्थित केला आहे. डोळ्यांना दिसत नाही, पायांनी चालता येत नाही, शरीर थकलेले आणि सोबतीला भोळसर मुलगा… अशा परिस्थितीत एका मोडकळीस आलेल्या घरात त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. पोटाला अन्न नाही, घरात धान्य नाही, रेशन मिळत नाही आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदानही वेळेवर मिळत नसल्याची त्यांची व्यथा आहे.
डोळ्यांत अश्रू… ओठांवर मदतीची आर्त हाक!
धोंडाबाईंची अवस्था पाहिली की माणुसकीचाही कंठ दाटून येतो. राहण्यासाठी दहा बाय बाराचे पडकं घर, बसण्यासाठी साधी खाट नाही. जमिनीवर बसून दिवस काढायचे. अंगावर फाटकी साडी, डोक्यावर गुलाबी रुमाल आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी पोत्याची कानटोपी! आयुष्याच्या संध्याकाळी या माऊलीच्या वाट्याला आलेले वास्तव मन सुन्न करणारे आहे.
आईला दिसत नाही, मुलाला परिस्थिती समजत नाही!
धोंडाबाई यांना एक मुलगा आहे. मात्र तो भोळसर असल्याने आईची जबाबदारी समर्थपणे सांभाळणे त्याला शक्य होत नाही. स्वतःला उठता-बसता येत नाही, चालता येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही. अशा अवस्थेत आई-मुलाचा संसार कसा चालत असेल, याची कल्पनाही करवत नाही.
रेशनकार्ड आहे, पण धान्य कुठे?
धोंडाबाईंच्या म्हणण्यानुसार त्यांना शासनाकडून रेशन मिळत नाही. घरात धान्य नाही, खाण्यासाठी अन्न नाही. पाणी आणण्यासाठीही दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. गावातील काही लोक थोडेफार पैसे देतात. त्यावरच कसाबसा उदरनिर्वाह सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रावणबाळ योजनेचे अनुदानही वेळेवर नाही!
वृद्ध, निराधार नागरिकांना आधार देण्यासाठी शासनाने श्रावणबाळ योजना सुरू केली आहे. मात्र धोंडाबाईंच्या तक्रारीनुसार या योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नाही. ज्या वयात आधाराची गरज आहे, त्याच वयात त्यांना मदतीसाठी दारोदारी पाहण्याची वेळ आली आहे. योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर अशा योजनांचा उपयोग तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पत्रकारांसमोर अश्रूंचा बांध फुटला!
पत्रकारांनी धोंडाबाईंच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. आपली व्यथा मांडताना त्यांचे डोळे पाणावले. त्यांच्या जगण्याची परिस्थिती पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले.
शेवटी धोंडाबाईंनी केलेली आर्त विनंती काळजाला भिडणारी आहे.
‘माझ्यासाठी काहीतरी करा… जगण्यासाठी मला काहीतरी मिळवून द्या!’
या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष सामावलेला आहे.
प्रशासनाच्या संवेदनशीलतेची कसोटी!
धोंडाबाई गाडे यांना तातडीने रेशनचा लाभ सुरू करावा, श्रावणबाळ योजनेचे थकीत अनुदान तपासून मिळवून द्यावे, वैद्यकीय मदत उपलब्ध करावी आणि त्यांना नियमित अन्न-पाणी व दैनंदिन देखभालीसाठी आवश्यक आधार मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संबंधित सामाजिक कल्याण विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.
शेवटी एक प्रश्न...
शासनाच्या योजना कोणासाठी आहेत? गरजू, निराधार आणि अपंग नागरिकांसाठीच ना? मग धोंडाबाईंसारख्या असहाय्य माऊलीला जगण्यासाठी पत्रकारांसमोर अश्रू ढाळून मदतीची याचना का करावी लागते?
धोंडाबाईंना आश्वासन नको, भाषण नको… त्यांना जगण्यासाठी अन्न, औषध आणि माणुसकीचा आधार हवा आहे!
⭕ सिंहवाणीचा सवाल : धोंडाबाईंच्या घरापर्यंत शासनाची मदत पोहोचणार कधी?
✍️ संपादक : किशोर आबिटकर
सत्याच्या बाजूने उभी राहणारी पत्रकारिता! 💐
