शक्तिपीठ महामार्गाविरोधात भुदरगडचा उद्रेक! पहाटेच्या मोजणीला शेतकऱ्यांचा एल्गार; म्हसवेत कर्मचाऱ्यांना मारहाण, कोनवडेत साहित्य पेटवले! नाधवडे, म्हसवे, कोनवडे, निळपण, दारवाडमध्ये संघर्षाचा भडका; मोजणी पथकाला माघार, गारगोटीत हजारोंचा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा!

शक्तिपीठ महामार्गाविरोधात भुदरगडचा उद्रेक! पहाटेच्या मोजणीला शेतकऱ्यांचा एल्गार;
म्हसवेत कर्मचाऱ्यांना मारहाण, नाधववडेत साहित्य पेटवले!
नाधवडे, म्हसवे, कोनवडे, निळपण, दारवाडमध्ये संघर्षाचा भडका; मोजणी पथकाला माघार, गारगोटीत हजारोंचा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा!
सिंहवाणी विशेष | गारगोटी
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावरून भुदरगड तालुक्यात अखेर शेतकऱ्यांच्या संतापाचा स्फोट झाला! विरोध डावलून पहाटेच्या अंधारात पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलेल्या मोजणीच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. नाधवडे येथे पोलीस आणि शेतकऱ्यांत झटापट, म्हसवे येथे मोजणी कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावल्याचा प्रकार, तर कोनवडे येथे मोजणीसाठी आणलेले ट्रायपॉड स्टॅन्ड पेटवून देण्यात आले. या घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर मोजणीचे काम बंद करून प्रशासनाच्या पथकाला माघारी फिरावे लागले.
या संघर्षाची धग एवढ्यावरच थांबली नाही. सकाळी अकराच्या सुमारास हजारो शेतकरी, महिला आणि नागरिकांनी गारगोटी येथे भुदरगड प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शक्तिपीठ महामार्गाविरोधात जोरदार एल्गार पुकारला. शेतकऱ्यांचा विरोध स्पष्ट असताना प्रशासन मोजणीचा आग्रह का धरत आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
पहाटे पाचलाच पोलीस बंदोबस्तात मोजणीचा प्रयत्न!
मंगळवारी पहाटे सुमारे पाच वाजता पोलीस बंदोबस्तात प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि Monarch कंपनीचे पथक म्हसवे, निळपण, दारवाड, नाधवडे आणि कोनवडे परिसरातील शेतशिवारात मोजणीसाठी दाखल झाले. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मोजणी पथक आल्याची माहिती मिळताच गावागावांत निरोप पोहोचले. काही वेळातच शेकडो शेतकरी मोजणीच्या ठिकाणी जमा झाले.
‘आम्ही विरोध करत असताना आमच्या शेतात मोजणी करण्याचे धाडस केलेच कसे?’ असा जाब शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. ‘आमच्या संमतीशिवाय आमच्या जमिनीची मोजणी कशी करता? जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची!’ अशा घोषणांनी शेतशिवार दणाणून गेले.
नाधवडेत झटापट; शेतकरी जखमी
नाधवडे येथे मोजणीची मशीन ताब्यात घेण्याच्या प्रयत्नातून पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची व झटापट झाली. यावेळी धक्काबुक्की होऊन एक शेतकरी जखमी झाल्याची माहिती आहे.
‘मशीनला हात लावू नका, सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नका,’ असे पोलीस सांगत असताना शेतकऱ्यांनीही पोलिसांना थेट सवाल केला. ‘तुम्ही शेतकऱ्यांची मुले नाहीत का? शेतकऱ्यांच्या वेदना तुम्हाला समजत नाहीत का?’ या प्रश्नांनी घटनास्थळी वातावरण अधिकच तापले.
म्हसवेत कर्मचाऱ्यांना मारहाण; कोनवडेत मोजणी साहित्य पेटवले!
म्हसवे येथेही मोजणी पथकाला शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. संतप्त शेतकऱ्यांनी मोजणी कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावल्याची माहिती समोर आली आहे.
कोनवडे येथे संतापाचा उद्रेक अधिक तीव्र झाला. मोजणीसाठी आणलेला ट्रायपॉड स्टॅन्ड शेतकऱ्यांनी हिसकावून घेत भररस्त्यात पेटवून दिला. या घटनांमुळे प्रशासनाच्या मोजणी मोहिमेला मोठा अडथळा निर्माण झाला.
कागल तालुक्यातही आंदोलनाची ठिणगी!
नाधवडे येथील संघर्षाचे वृत्त समजताच कागल तालुक्यातील बोरवडे आणि उंदरवाडी येथील ग्रामस्थही रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची व्याप्ती भुदरगडच्या सीमांपलीकडेही वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले.
“शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीविरोधातील संघर्षाची तीव्रता केवळ ऐकीव नसून, सिंहवाणीच्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली असताना या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यामुळे भुदरगडमधील शेतकऱ्यांचा उद्रेक आणि प्रशासनासमोर निर्माण झालेली परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.”
गारगोटीत हजारोंचा मोर्चा; महिलांचाही मोठा सहभाग!
पहाटेच्या घटनांनंतर सकाळी अकराच्या सुमारास गारगोटी येथे शेतकऱ्यांचा जनसागर उसळला. हजारो शेतकरी, महिला आणि नागरिकांनी एकत्र येत भुदरगड प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी गारगोटी शहर दणाणून गेले.
महिलांनीही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला. शेतजमीन, उपजीविका आणि भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग मान्य नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.
प्रशासनाची समजूत काढण्याची धडपड; शेतकरी भूमिकेवर ठाम!
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रांताधिकारी हरीश सूळ आणि तहसीलदार अर्चना पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला. मोजणीचे काम बंद पडल्याने प्रशासनाच्या पथकाला अखेर माघार घ्यावी लागली.
आता प्रशासन शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार की संघर्ष आणखी तीव्र होणार?
भुदरगड तालुक्यातील आजच्या घटनांनी शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना पोलीस बंदोबस्तात पहाटेच्या वेळी मोजणी करण्याची घाई का करण्यात आली? स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद आणि विश्वास संपादन करण्याऐवजी संघर्षाची परिस्थिती का निर्माण झाली? शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उपजीविकेच्या प्रश्नावर प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे?
हे प्रश्न आता अनुत्तरित आहेत.
*महामार्ग विकासासाठी असेल, तर शेतकऱ्यांच्या विनाशाची किंमत त्यांना का मोजावी लागावी? विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा आवाज दडपता येणार नाही, हा संदेश आज भुदरगडच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.*
भुदरगडचा हा संघर्ष आता केवळ मोजणीपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो शेतजमिनीच्या हक्काचा आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे!
आज शेतकऱ्यांच्या मोर्चात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते यामध्ये विजय देवणे, कॉ संपत देसाई, राहुल देसाई, मधुकर देसाई अप्पा, शामराव दादा देसाई, रामभाऊ कळंबेकर, अजित पवार शेतकरी संघटना, मच्छिन्द्र मुगडे, संदीप देसाई, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्च्याचे संयोजक शक्तिपीठ बचाव समितीचे कॉ सम्राट मोरे होते
**✍️ संपादक : किशोर आबिटकर**