कारदगा येथे रविवारी २९ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन! ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड अध्यक्षस्थानी; साहित्य, कविता, मुलाखत आणि विनोदी भारूडाची रसिकांना मेजवानी

कारदगा येथे रविवारी २९ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन!
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड अध्यक्षस्थानी;
साहित्य, कविता, मुलाखत आणि विनोदी भारूडाची रसिकांना मेजवानी
सिंहवाणी ब्युरो | कारदगा (ता. निपाणी) :
ग्रामीण भागात मराठी साहित्याची गोडी वाढविण्यासह नवोदित लेखक, कवी आणि साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने कारदगा येथील साहित्य विकास मंडळाच्या वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी २९ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड (बेळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात साहित्य, विचार, काव्य, उद्योजकता आणि लोककलेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.
सकाळी ८ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत चार सत्रांत रंगणाऱ्या या साहित्य सोहळ्यात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुस्तक प्रकाशन, प्रसिद्ध लेखक व उद्योजक शरद तांदळे यांची मुलाखत, कवी संमेलन आणि विनोदी भारूड अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
कारदगा येथील डी. एस. नाडगे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी राजू कुराडे यांनी स्वागत केले, तर प्रकाश काशीद यांनी संमेलनाची सविस्तर रूपरेषा मांडली.
ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ
सकाळी ८ ते १० या वेळेत ग्रंथदिंडी काढून संमेलनाची सुरुवात होणार आहे. सकाळी १०.३० वाजता पहिल्या सत्रातील उद्घाटन समारंभाला प्रारंभ होईल. सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजी कागणीकर (बेळगाव) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, शिरोळ दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले जाणार आहे. हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक उस्मानगणी पटेल यांच्या हस्ते सरस्वती मूर्तीचे पूजन होईल.
भिवशी येथील रतन मेळवंकी यांच्या हस्ते साहित्यनगरीचे, तर समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे महासचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन होणार आहे. बाळासाहेब नाडगे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत.
यावेळी प्रा. डॉ. अच्युत माने (निपाणी) लिखित ‘स्नेहबंध’ आणि डॉ. संभाजी कुर्लीकर (कुर्ली) लिखित ‘तुझ्याविना जगताना’ या पुस्तकांचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.
उद्योजक शरद तांदळे यांच्याशी साहित्यिक संवाद
दुपारी २ ते ४ या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे (पुणे) यांची विशेष मुलाखत आयोजित केली आहे. महेश घोटणे (कुरुंदवाड) त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. साहित्यिक प्रवास, उद्योगविश्वातील अनुभव, संघर्ष आणि यशाचा प्रवास याविषयी जाणून घेण्याची संधी या मुलाखतीतून मिळणार आहे.
‘जागर कवितेचा, गौरव मराठीचा’
दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या तिसऱ्या सत्रात ‘जागर कवितेचा, गौरव मराठीचा’ या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील डॉ. स्वप्निल चौधरी, संभाजीनगर येथील गुंजन पाटील आणि बेळगाव येथील नाईकबा गिड्डे हे कवी आपल्या कवितांच्या माध्यमातून रसिकांना साहित्यिक आनंदाची अनुभूती देणार आहेत.
विनोदी भारूडातून मनोरंजनासह प्रबोधन
सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या चौथ्या सत्रात संतोष महाराज पुजारी कडवेकर व सहकलाकार (सातारा) यांचा विनोदी भारूडाचा कार्यक्रम होणार आहे. पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून विनोद, मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
आरोग्य आणि योग शिबिराचेही आयोजन
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह योग, प्राणायाम आणि ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योग शिक्षक बाळासाहेब नाडगे आणि यशवंत वडगावे यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या संमेलनाला खासदार प्रियंका जारकीहोळी, आमदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार सुभाष जोशी, उत्तम पाटील, अण्णासाहेब हवले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे, उपाध्यक्ष संभाजी अलंकार, सचिव इम्रान पटेल, सुभाष ठकाणे, महादेव दिंडे, बाळासाहेब नाडगे, भाऊसाहेब चिंदके, सुनीता कोगले, सुनीता वराळे, शिवाजी माने, महावीर पाटील, अमोल व्हनवाडे, आप्पासाहेब कुरणे, सदाशिव पारगावे, प्रशांत खराडे, विनोद परीट यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कल्पना रायजाधव यांनी आभार मानले.
*ग्रामीण भागातील साहित्य चळवळीला बळ देणारे आणि मराठी भाषेचा जागर करणारे हे २९ वे संमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.*