आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंहवाणी विशेष: मठगावचे महादेव मंदिर अकराशे वर्षे पुराणे मठगाव- पाटगाव चा परिसर पुरातन काळात वैभव संपन्न : किशोर आबिटकर (वरिष्ठ पत्रकार ) संपादक सिंहवाणी

सिंहवाणी विशेष:

मठगावचे महादेव मंदिर अकराशे वर्षे पुराणे

मठगाव- पाटगाव चा परिसर पुरातन काळात वैभव संपन्न


( भाग दोन)


किशोर आबिटकर

(वरिष्ठ पत्रकार )
संपादक सिंहवाणी

मठगावचे महादेव मंदिर अति प्राचीन असून त्याचे अस्तित्व सुमारे अकराशे वर्षां पूर्वीचे असल्याचे दिसून येते. या परिसरात हे देवस्थान जागृत असल्याची भावना नागरिकांच्यात आहे. असे असले तरी या मंदिराची माहिती तालुक्याच्या अन्य भागात तसेच कोल्हापूर जिल्ह्यात फारशी नाही. या मंदिराचा इतिहास काय असावा ? याची माहिती संकलित केली असता ती थक्क करणारी अशीच आहे.
मठगाव पाटगाव हा परिसर वर्तमानात दुर्गम, डोंगराळ, जंगलांनी वेढलेला, रस्त्याच्या सोई गेल्या 20- 30 वर्षापर्यंत नसलेला असाच होता. आता कुठे या परिसरात रस्ते, वीज, पाण्याच्या सोयी व्हायला लागल्या आहेत. पण इतिहासाचा मागोवा घेतल्यानंतर समजते की पाटगाव मठगाव परिसरातील नागरी जीवन संपन्न, समृद्ध होते चांगला व्यापार उदिम होता. शेकडो वर्षांच्या कालखंडानंतर हे चित्र पालटले.

मठगाव शिवमंदिराबाबतची स्थानिक वयोवृद्ध नागरिकांकडून गेल्या 40 वर्षापासून मी माहिती मिळवत आहे. या मंडळींकडून वेळोवेळी मिळालेली माहिती, आख्यायिका आणि मंदिर परिसरातील वस्तुस्थिती याचा विचार करता इतिहासातील अनेक बाबीवर प्रकाश झोत पडतो.
स्थानिक वयोवृद्धांच्या मते हे मंदिर 400 वर्षांपूर्वीचे असावे, तर काहींच्या मते हे मंदिर त्या पूर्वीचे म्हणजे शिवकाळापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. सध्या मंदिर छोटे म्हणजे फक्त गाभारा आणि त्याच्या समोरील थोडासा भाग अस्तित्वात असला तरी पूर्वी हे मंदिर खूप मोठे आणि प्रशस्त होते. स्थानिकांच्या मते सध्याच्या मंदिराखाली आणखी एक मजला असावा. तसेच मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूला जिथे लिंगाचे देवस्थान आहे त्या बाजूने निघणारे भुयार होते, असे सांगण्यात येते. सुमारे 100 वर्षांपूर्वी हे भुयार पाहिल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
मंदिराचा आकार सुमारे 120 फूट रुंद आणि लांबी 150 फूट असावी. काहींच्या म्हणण्यानुसार हे मंदिर पांडवकालीन तर काहींच्या म्हणण्यानुसार हेमाडपंथी असावे,
या मंदिराच्या परिसरात पूर्वी मोठी वस्ती असल्याचे बुजुर्ग सांगतात. तर या गावात तीन चार पिढ्यांपूर्वी मोठा व्यापार असल्याची माहिती ही अनेकांकडून मिळते.
इतके भव्य मंदिर अशा दुर्गम, जंगलात कोणी बांधले असावे ? ते इथेच बांधण्याचे कारण काय ? आणि ते नक्की कोणत्या कालखंडात बांधले असावे ? असे अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे इतिहासातील घटनांच्या आधारे पडताळून पाहू.

शिलाहार राजवट



या परिसरात नवव्या शतकापासून शिलाहार राजवंशाच्या सत्ता होती. शिलाहार राजवटीच्या तीन शाखा होत्या. त्यापैकी कोल्हापूर विभागा अंतर्गत हा परिसर येतो. या परिसरात पूर्वी नवव्या शतका पर्यंत राष्ट्रकूट राज्याची सत्ता होती. शिलाहार या काळात राष्ट्रकुट राजाच्या पदरी होते. नवव्या शतकामध्ये राष्ट्रकूट सत्ता खिळखिळी झाल्यानंतर शिलाहरांचे वर्चस्व निर्माण झाले. इसवी सन 940 ते 960 च्या दरम्यान शिलाहार वंशाचा प्रथम राजा जातीका यांने या परिसरावर आपला अंमल बसवला. या राजाकडे कोल्हापूर, सातारा, बेळगाव, कोकण गोव्यापर्यंतच्या परिसरातील मोठे राज्य होते. या राजवंशातील जातीका द्वितीय या राज्याची कारकीर्द 1000 ते 1020 पर्यंत होती. या राजवटी पासून पाटगाव मठगाव हा परिसर राजवटीचे प्रशासकीय, लष्करी आणि व्यापारी केंद्र होते.

राजा जातीका द्वितीय याच्या कारकीर्दीत अनेक सुधारणा झाल्या. या राजानंतर सुमारे दीडशे वर्षात अनेक राजे होऊन गेले. पुढे 1175 ते 1215 या काळात या वंशातील राजा भोज द्वितीय याने सत्ता चालवली. या राजाची कारकीर्द दैदिप्यमान अशीच ठरली. या दोन राजां मधल्या दीडशे वर्षात अनेक राजे होऊन गेले. पण त्यांचा प्रभाव जाणवत नाही. मात्र राजा भोज द्वितीय यांने आपल्या कारकिर्दीत मोठी बांधकामे केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता किल्ले पन्हाळा, भुदरगड, विजयदुर्ग, रांगणा यांसारख्या किल्ल्यांचे बांधकाम केले. याबरोबरच खिद्रापूर येथील मंदिराचेही बांधकाम त्याच्याच काळात झाले असल्याचे उल्लेख आहेत
ही सर्व भौगोलिक व ऐतिहासिक परिस्थिती पाहिली असता मठगाव येथील महादेव मंदिराचे बांधकाम त्याच कालावधीत झाले असावे. शिलाहार राजवटीच्या काळात भुदरगड ते विजयदुर्ग या संपूर्ण परिसरात त्याचा अंमल होता. समुद्रावरून येणारा माल हनमंता घाटातून वर आल्यावर तो पाटगाव मठगाव या ठिकाणी येऊन तिथून पुढे राज्याच्या अनेक भागाकडे वितरित होत असावा. या ठिकाणी मोठे व्यापारी केंद्र होते. प्रशासकीय केंद्र होते, लष्करी केंद्रही होते. त्याकाळी या परिसरातील जनता सुखी, संपन्न होती. याचा संदर्भ घेतला असता महादेव मंदिराचे बांधकाम याच काळात झाले असावे, ही शक्यता ठळक होते.

देवगिरीच्या यादवांचा काळ

नव्या ते बाराव्या शतकापर्यंत शिलाहरांचे राज्य वैभव संपन्न होते. त्याचा अंमल दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण, गोवा इतक्या मोठ्या प्रदेशात होता. याच समकालीन देवगिरीच्या यादवांचेही साम्राज्य होते. त्याचा विस्तारही खूप मोठा होता. देवगिरीच्या यादवांच्या काळात अनेक समाज उपयोगी कामे, मंदिरांची बांधकामे झाली.
यादवांनी त्यांचा प्रधान हेमाद्री पंत यास निर्देश देऊन बांधकाम शैलीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे हेमाद्री पंतांने आपल्या राज्यातील तज्ञ कारागिरांना एकत्र करून बांधकाम शैली विकसित केली. या शैलीस पुढे हेमाडपंती असे संबोधले जाऊ लागले. यादव वैष्णव पंथाला मानत असल्याने त्यांनी प्रामुख्याने विष्णू , श्रीकृष्ण यांची मंदिरे बांधली.

या समकालात कोल्हापूरच्या दक्षिण पश्चिम भागात शिलाहरांचे वर्चस्व असल्याने यादव कालीन बांधकामांचा संबंध या ठिकाणी येत नाही. हेही लक्षात घ्यायला हवे.

12 व्या शतकानंतर यादवांनी शिलाहारांचा पराभव केल्यानंतर त्याच्या आमलाखाली कोल्हापूरचा हा भाग आला. या काळात यादवांनी आपले दक्षिणेकडील केंद्र सांगली परिसरात केले होते. पुढे यादवांचा पराभव मोंगलांनी केल्यानंतर यादव साम्राज्याचा ऱ्हास झाला. पर्यायाने हा परिसर ही मोंगलांच्या ताब्यात गेला. पुढील तीन शतके या परिसरात सत्ता अलटून पालटून होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत या परिसरात स्थिर सत्ता नव्हती.

वरील सर्व ऐतिहासिक, राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती पाहता मठगावचे शिव मंदिर बाराव्या शतकात शिलारांनी म्हणजेच शिवभक्त असलेल्या भोज राजा द्वितीय यांने बांधले असावे, हे स्पष्ट होते. त्यामुळे हेमाडपंथी, पांडवकालीन बांधकाम नाही, हे ही स्पष्ट होते.

शिलाहार वंशातील भोज राजाच्या पदरी सोमनाथ सुरी ( 1190 ते 1215) नावाचे काश्मिरी ब्राह्मण कवी होते. त्यांनी बृहतसंहिता नावाचा ग्रंथ कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा परिसरातील एका मंदिरात लिहिला असल्याचा संदर्भ मिळतो. याचाच अर्थ असा की भोज राजाच्या काळात कले बरोबरच साहित्यालाही महत्त्व असल्याचे स्पष्ट होते.

भाग दोन
क्रमशः

किशोर आबिटकर
(वरिष्ठ पत्रकार)
संपादक सिंहवाणी .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??