ताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय

दिल्ली सह देशभरात परिवर्तनाचे वारे.. इंडीया आघाडी जोरात : भाजपचा ४०० पार चा नारा फेल.. दोनशेचा टप्पा गाठणे मुश्किल

दिल्ली सह देशभरात परिवर्तनाचे वारे
इंडीया आघाडी जोरात

भाजपचा ४०० पार चा नारा फेल
दोनशेचा टप्पा गाठणे मुश्किल


किशोर आबिटकर

वरिष्ठ पत्रकार


हिंदुस्थानच्या लोकसभेची निवडणूक आता मध्यावर आली आहे. ही निवडणूक लोकतंत्र वाचवण्यासाठीची असल्याचे विरोधकांकडून सांगितले जत आहे, तर सत्ताधारी पक्ष चारशे पार चा नारा देऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. या निवडणुकीतून देशभरातल्या लोकांचा काय कल आहे? यातून काय निष्पन्न होऊ शकते? याचा अंदाज घेण्यासाठी सिंहवाणी लाईव्ह न्यूज आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप च्या शेकडो पत्रकारांनी देशभरातील अनेकांशी संपर्क साधून आकलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या आकलनाचे विश्लेषण सिंहवाणी च्या वाचकांसाठी आम्ही येथे देत आहोत.
भाजपने जरी 400 पार चा नारा दिला असला तरी निवडणूकीचे दोन टप्प्ये पार पडले असताना या नाऱ्यातील हवा निघून गेल्याचे दिसून येत आहे. जमीन स्तरावरून येणाऱ्या माहितीवरून दिसून येते की देशात दहा वर्षे कार्यरत असलेल्या मोदी सरकार विरुद्ध प्रचंड नाराजी, वाढती महागाई, बेरोजगारी, अतिरेकी हिंदुत्व, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे झालेले दुर्लक्ष अशा अनेक प्रश्नातून जनता वैतागलेली असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीकडे पाहता 400 सोडा पण 200 पर्यंत जरी मजल मारली तर खूप झाले, असे राजकीय तज्ञांचे मत बनत चालले आहे.

वरील प्रश्नाबरोबरच प्रादेशिक आणि राज्या राज्यातून स्थानिक प्रश्नही समोर येत आहेत. भाजपाला सहकार्य करणाऱ्या अनेक जातीतून नाराजी पसरली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या वक्तव्यामुळे भाजपाच्या पाठीशी असलेला राजपूत समाज विरोधात गेला आहे. जाट, मराठा, सैनी आदिवासी ओबिसी समाज शेतकरी कामकरी असे अनेक वर्ग उघडपणे विरोधात गेल्याचे दिसते.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षातील घटनांनी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सत्ताधारी पक्षाची गेल्या दहा वर्षातील राजवट, फोडाफोडीचे राजकारण, सरकारी यंत्रणांचा मनमानी वापर, निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण या स्थितीत होत असलेली ही निवडणूक आणि सत्ताधारी पक्षाने केलेली 400 पार ची घोषणा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची केलेली घोषणा, याविषयी देशभरात भ्रम पसरवला जात होता. त्यातच प्रसार माध्यमातून होणारा एकतर्फी जयघोष, विरोधकच नाहीत.. असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न यातून ही निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र गेल्या एक-दोन वर्षात उभारले गेले होते. विरोधी नेत्यांची अटक, दबाव यामुळे ते संघटित न होता दबले जातील, दबावाखाली लढतील असेही चित्र उभे करण्यात आले होते. यातच मोदी शिवाय आहे कोण? या घोषवाक्याने तर मतदारांची चेष्टाच आरंभली होती.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीने दाखवलेला ताळमेळ आणि प्रत्येक राज्या राज्यातून उभारणारा एकसंघ विरोध जरी जाणवत असला तरी तो भाजपला मागे टाकील असे वाटत नव्हते. मात्र निवडणुकीचे दोन टप्पे पार पडल्यानंतर आता ही निवडणूक मध्यावर आली आहे. पहिल्या दोन टप्प्याच्या मतदानानंतर वातावरण वेगाने फिरत असल्याचे दिसू लागले. या टप्प्यानंतर भाजपचा 400 चा आकडा तर गेलाच पण दोनशे पर्यंत पोहोचू का नाही याविषयी भाजप नेतृत्वाला प्रश्न पडले आहेत. त्यांच्या एकूण हालचालीवरून तसे निश्चित जाणवते.

2019 ची स्थिती
2014 च्या निवडणुकीत वेगळी झालर होती. यूपीए दोन सरकार वरील महागाई, भ्रष्टाचार याविषयी पद्धतशीरपणे चालवलेली प्रचार यंत्रणा, मोदींचा उदय, 56 इंच छाती, काळा पैसा, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख, न खाऊंगा न खाने दूंगा यासारख्या घोषणा, यामुळे एनडीए आघाडीने हीच निवडणूक जिंकली नंतर 2019 मध्ये मोदींची लहर देशभर होती. त्यातच पुलवामा प्रकरण, सर्जिकल स्ट्राइक देशभक्ती यातून 2019 ची निवडणूक भाजपाला तीनशे पार घेऊन गेली.
2019 मध्ये झालेल्या निवडणुकीचा थोडासा मागवा घेत त्याचे विश्लेषण करून पाहू

2019 च्या निवडणुकीच्या निकालाची माहिती घेत असताना मी देशातील एकूण 36 घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची तीन गटात विभागणी केली आहे. यामध्ये पहिला गट 15 राज्यांचा असून यात भाजप काही ठिकाणी शून्य तर काही ठिकाणी नाममात्र आहे. या गटामध्ये एकूण शंभर जागा असून यापैकी भाजपने केवळ पाच जागा जिंकल्या होत्या.

दुसरा गट दहा राज्यांचा असून या 10 राज्यांमध्ये भाजपचे जबरदस्त वर्चस्व होते. या ठिकाणी असलेल्या 138 जागांपैकी 133 जागा भाजपने जिंकल्या होत्या

तिसरा गट 11 राज्यांचा असून या राज्यात भाजपला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. या दहा राज्यांमध्ये 305 जागा असून 165 जागा त्यावेळी एनडीए ने जिंकल्या होत्या.


2024 चे वातावरण
निवडणूक जाहीर होईपर्यंत राम मंदिर, हिंदू मुस्लिम, हिंदुत्व अशा अनेक नेरेटीव्हसह भाजप आघाडीवर होता. निवडणूक लागताच आणि इंडिया आघाडीत जागांचे सुरळीत वाटप होताच भाजप गटात अस्वस्थता पसरली. पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा ट्रेंड उलट गेल्याचे लक्षात आल्यानंतर देशभरातील हालत दिवसेंदिवस खराब होताना भाजप नेत्यांना दिसून आले


आजची स्थिती
भाजप कितीही म्हणत असले तरी चारशे पार तरी अनेकांना माहीत होते की हा आकडा गाठणे शक्य नाही. दक्षिणेतील राज्यात भाजप कुठेच नाही. त्यात कर्नाटकात मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र, बिहार या राज्यातून जागा मिळतील तेवढ्या अधिक आणायच्या हे प्रयत्न भाजपकडून गेले दोन वर्षापासून चालू आहेत. यावरूनच त्यांची रणनीती दिसून येते

या निवडणुकीत मोदी लाट ओसरली आहे. सरकारवर प्रचंड नाराजी आहे. महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न तर आहेतच. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत. छोटे व्यापारी, दुकानदार यांच्या प्रश्ना प्रश्नांना जीएसटी ने कधीच वाटेला लावलेले आहे, 2019 सारखी कोणती स्थिती आज नाही. मग सत्तापक्ष 400 पर्यंत जाऊ शकेल का? असे प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यात विचारला जाऊ लागला आहे.
गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला मदत करेल असा कोणताच मुद्दा नाही. तरी गत निवडणुकीत राज्यवार आकड्यातून सत्तापक्ष कुठे जागा गमावणार आणि कुठे मिळवणार हे पहावे लागेल.

भाजप या निवडणुकीत कोणत्या राज्यामध्ये जागा गमावण्याची शक्यता आहे ती प्रमुख राजे पाहू

राजस्थान
राजस्थानमध्ये 19 मध्ये भाजपने 25 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या पण यावेळी चित्र वेगळे आहे या ठिकाणी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे असणारा जाट, राजपूत, मीना यासारखे समाज भाजपच्या उलटे गेले आहेत. वसुंधरा राजेंना ऐनवेळी मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले याची नाराजी, अचानक आलेले मुख्यमंत्री भजन लाल शर्मा या दोन बाबीमुळे राजस्थानात राजकीय उलथापालक झाल्याची दिसून येते. मुख्यमंत्री भजन लाल आणि अशोक गेहलोत या दोन नेत्यांच्या कारभारात होत असलेली तुलना, गेहलोत यांच्या लोकोपयोगी योजना याची तुलना होत आहे. याशिवाय भाजपा अंतर्गत कुरबुरी आणि इंडिया आघाडी ताकदीने देत असलेली लढत यामुळे यावेळी भाजप 8 ते 10 जागा गमावण्याच्या स्थितीत आहे. राजस्थानच्या शेखावटी भागात तर भाजपची स्थिती अतिशय बिकट झाली आहे.

हरियाणा

गेल्या तीन-चार वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेला शेतकऱ्यांचा लढा, मुख्यमंत्री खट्टर यांची अचानक उचल बांगडी, दिल्लीत झालेले पहिलवान आंदोलन, जाट समाजाचा प्रखर विरोध, यासारख्या समस्यांमुळे पाच ते सहा जागा गमवाव्या लागतील असे चित्र आहे. या ठिकाणी इंडिया आघाडी सहा जागा तर एनडीए चार जागा असे बलाबल होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश

देशात सर्वाधिक जास्त जागा 80 जागा असणारे उत्तर प्रदेश म्हणजे भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. गत निवडणुकीत 80 पैकी 64 जागा मिळाल्या होत्या. या ठिकाणी इंडिया आघाडी ताकतीने लढत असून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने येथे आघाडी घेतली आहे. पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांनी भाजपला जोरदार विरोध केलाय. राष्ट्रीय लोक दल चे जयंत चौधरी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे या परिसरात नाराजीचे चित्र आहे. उत्तर प्रदेश मध्ये योगी शहा वाद, मायावतींच्या ताकतीत होत असलेली घट, ब्रिज भूषण, प्रकरण राजपूत, सैनी समाजाचा विरोध आणि देशभर असलेले सर्व मुद्दे यांचा परिणाम पाहता भाजपला 10 ते 14 जागा गमावल्या लागणार असल्याचे चित्र आहे म्हणजेच भाजप उत्तर प्रदेश मध्ये पन्नासच्या आतच थांबणार आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात राजकारणाचा जो खेळ झालाय त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक वैतागले आहेत. शिवाय पक्ष फोडून, वाटेल ते करून 48 पैकी 42 जागा जिंकायच्याच या भूमिकेमुळे एनडीए इथेही गोत्यात आली आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे व शरद पवार यांना सहानभूती मिळत असून या सहानभूतीचे दिवसा गणित लाटेत रूपांतर होताना दिसत आहे. महाराष्ट्रात वरील सर्व मुद्द्यांबरोबरच मराठा धनगर यांची आंदोलने, संविधान, लोकतंत्र बचाव शेतकऱ्यांचे मुद्दे, डबल इंजिन सरकारवर असलेली नाराजी हे मुद्दे एनडीए ला जड जात असून महाराष्ट्रात एनडीएला 24 ते 26 जागा गमवाव्या लागत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि इंडिया गटबंधन च्या पुढे एनडीए बॅक फुटवर असून एनडीएला येथे दहा जागा गमावया लागत आहेत.

कर्नाटक

कर्नाटकात 2019 आली भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकून विक्रम केला होता. मात्र यावेळी ही परिस्थिती नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला पुरते हरवले आहे. कर्नाटकात भाजप सरकार विरुद्ध प्रचंड असंतोष आहे या राज्यातून गेलेल्या भारत जोडो यात्रेला प्रचंड मिळालेला प्रतिसादामुळे कर्नाटकात लोकसभेसाठीही काँग्रेसला मदत मिळत आहे. या ठिकाणी भाजपला 15 जागा गमवाव्या लागत आहेत

बिहार

जी गत महाराष्ट्राच्या राजकारणाची तीच बिहारच्या राजकारणाची असल्याने बिहारमध्ये एनडीए बॅकफूटवर आले आहे. निवडणुकीच्या तोंडाशीच नितिश कुमार यांना फोडून घेऊन सत्ता स्थापन केली. सत्ता मिळाली पण जनमत कमी झाले अशी अवस्था या ठिकाणी झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी इंडिया आघाडीची बाजू जोरात लावून धरली आहे. डबल इंजिन सरकारवरील नाराजी, इडी सीबीआय सारख्या मुद्द्यामुळेच तेजस्वी यादव येथे उजवे ठरत आहेत. या ठिकाणी भाजपच्या जागेत घसरण होत असून भाजपला केवळ दहा जागांवर समाधान मानावे लागेल असे दिसून येते.

झारखंड आणि दिल्ली या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या तोंडावर अटक केल्यानंतर या राज्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. याचा फटका एनडीए आघाडीला बसताना दिसत आहे. तेलंगणा, आसाम, ओडिशा या राज्यांमधून ही भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत. तर आंध्र, केरळ, तामिळनाडू आदी राज्यात भाजप खातेही उघडू शकणार नाही.

निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्याच्या मतदानाचा ट्रेंड पाहता व सर्व्हे मधून आलेल्या आकलनानुसार लोकसभेच्या 543 जागांपैकी इंडिया आघाडी 300 पार पर्यंत पोहोचू शकते. तर एनडीएला 195 ते 205 पर्यंत मजल मारता येईल.


किशोर आबिटकर
वरिष्ठ पत्रकार
संपादक
सिंहवाणी लाईव्ह न्युज

उद्याच्या अंकी महाराष्ट्र
विभागवार विश्लेषण


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??