ताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय

दिल्ली आंदोलन तीव्र; ‘संसद चलो’ मोर्चावर पोलिसांचा लाठीमर , सरकार बॅक फुटवर : देशभरात संतापाची लाट

दिल्ली आंदोलन तीव्र;

संसद चलो’ मोर्चावर पोलिसांचा लाठीमर , सरकार बॅक फुटवर : देशभरात संतापाची लाट


नवी दिल्ली / सिंहवाणी ब्युरो :

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सोमवारी आणखी तीव्र झाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘संसद चलो’ मोर्चासाठी हजारो आंदोलक जंतर-मंतरवरून संसदेकडे निघाले. मात्र, दिल्ली पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेड्समुळे मोर्चा अडवण्यात आला. काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. जवळपास दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या बैठकीत त्यांनी नीट पेपरफुटीबाबत पक्षाच्या लेखी मागण्या सरकारसमोर मांडल्या. नड्डा यांनी या मागण्यांवर सरकारमध्ये चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सीजेपीने दिली आहे.
आंदोलनाचे प्रमुख नेते अभिजीत दिपके यांनी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर आपले बेमुदत उपोषण स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे. वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या सुटकेची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
सीजेपीची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. याशिवाय परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी स्वतंत्र चौकशी, तसेच कथित आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. मात्र, सरकारकडून अद्याप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरदार गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button