राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला; ‘विद्यार्थ्यांवर लाठीमाराबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी’ ‘ भारताच्या इतिहासातील सर्वात युवा-विरोधी पंतप्रधान

राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला; ‘विद्यार्थ्यांवर लाठीमाराबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी’ ‘
भारताच्या इतिहासातील सर्वात युवा-विरोधी पंतप्रधान
नवी दिल्ली / सिंहवाणी ब्युरो :
दिल्लीतील युवा-विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराबद्दल पंतप्रधानांनी देशाची आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात युवा-विरोधी पंतप्रधान आहेत,” असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.
संसदेत चर्चेला परवानगी नाकारल्याचा आरोप
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. मात्र, “यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल,” असे उत्तर त्यांना मिळाले. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असताना चर्चा टाळणे चुकीचे आणि अनैतिक असल्याचे त्यांनी म्हटले.
“पंतप्रधान शांत का?”
राहुल गांधी म्हणाले, “देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विद्यार्थी त्याविरोधात आंदोलन करत आहेत. तरीही पंतप्रधान मोदी मौन का बाळगत आहेत? विद्यार्थ्यांची माफी मागून त्यांच्यावर होणारी दडपशाही थांबवावी.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली. त्यांनी दावा केला की, देशात आतापर्यंत १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या असून ७.५ कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. मात्र, पेपरफुटीतील एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही. उलट न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार, अटक आणि दडपशाही केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
खर्गे यांचाही सरकारवर निशाणा
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सरकारवर टीका करत, “युवा-विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. आम्हाला बोलण्यापासून रोखले जात आहे,” असा आरोप केला.
खर्गे म्हणाले, “या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन द्यावे. लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या ६० वर्षांत संसदीय कामकाजाची अशी पद्धत मी कधी पाहिली नाही.”
