कडगाव परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा रास्ता रोको

कडगाव परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा रास्ता रोको
कडगाव / सिंहवाणी ब्युरो :
गारगोटी–कडगाव मार्गावरील महालक्ष्मी मंदिर परिसर तसेच गारगोटी–पाटगाव रोडलगत करडवाडी हद्दीतील स्वयंभू मारुती मंदिर परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार माहिती देऊनही वनविभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महालक्ष्मी मंदिर परिसरात प्रथम बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ना पिंजरा लावण्यात आला, ना नियमित गस्त वाढविण्यात आली. मुख्य मार्गावर अनेक वेळा वाहनांसमोरून बिबट्या जात असल्याचे प्रकार घडल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
संजय मारुती देसाई यांच्या शेतात बिबट्या
शुक्रवारी सायंकाळी करडवाडी येथील एका शेतकऱ्याच्या वाहनासमोर अचानक बिबट्या आल्याने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली. तसेच गारगोटी–पाटगाव रोडलगत करडवाडी हद्दीतील स्वयंभू मारुती मंदिर परिसरातील उसाच्या शेतातही बिबट्याचा वावर असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. हे शेत गारगोटी–सोनळी येथील संजय मारुती देसाई यांचे असून त्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
या भागात दोन दिवसांपूर्वी वनविभागाने दिवसभर शोधमोहीम राबवली होती. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.
नागरिकांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करत, “एखादा नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतरच वनविभाग जागा होणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावणे, कॅमेरा ट्रॅप बसविणे, रात्रीची गस्त वाढविणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली दखल
दरम्यान, या प्रकरणाची तक्रार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. आबिटकर यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निष्णप–करडवाडी परिसरातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.