जिल्हाताज्या घडामोडी

जंतरमंतर आंदोलकांवरील अत्याचाराचा गारगोटीत निषेध :तरुणांच्या क्रांतीची लाट देशात सत्ता परिवर्तन घडवेल : डॉ. सुभाष देसाई

जंतरमंतर आंदोलकांवरील अत्याचाराचा गारगोटीत निषेध:

तरुणांच्या क्रांतीची लाट देशात सत्ता परिवर्तन घडवेल : डॉ. सुभाष देसाई

गारगोटी / किशोर आबिटकर :
दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व आंदोलकांवरील पोलिस अत्याचाराच्या निषेधार्थ भुदरगड तालुक्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी गारगोटी येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात नागरिक, विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामुळे मुख्य रस्ता काही काळ आंदोलनकर्त्यांनी व्यापल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या सभेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत देशातील तरुणांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “देशभरात परिवर्तनाची लाट वेगाने पसरत असून ही तरुणाई आगामी काळात देशात सत्ता परिवर्तन घडवून आणेल. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे धर्म, जात किंवा पक्षीय राजकारणाच्या चष्म्यातून न पाहता लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीतून पाहिले पाहिजे.”
डॉ. देसाई यांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तरुणांवर दडपशाही करणे, त्यांना देशद्रोही किंवा समाजविघातक ठरविणे हे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विरोधी पक्षातील काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी-तरुणांवरील कथित पोलिस कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली.


विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणाऱ्यां सदाभाउंचे आभार मानतो” : अजित पोवार
सभेत बोलताना कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित पोवार यांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या आमच्या पोरा-बाळांना आतंकवादी म्हटल्याबद्दल मी सदाभाऊ खोत यांचे आभार मानतो. या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिक तीव्र झाला आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि न्याय मागणाऱ्या तरुणांना अतिरेकी ठरविण्याचे काम सुरू आहे. हीच तरुणाई एक दिवस अन्यायाविरुद्ध उभी राहून जुलमी सत्तेला धडा शिकवेल.”


मोर्चात विविध पक्ष व संघटनांचा सहभाग
या मोर्चात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, राहुल देसाई, सचीनदादा घोरपडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, प्रकाश पाटील, प्रकाश वास्कर, , प्राचार्य अर्जुन कुंभार, नंदकुमार मोरे, रामभाऊ कळंबेकर, पी. एस. कांबळे, मनसेचे राहुल पाटील, धनंजय देसाई, के. के. भारतीय, शहाजी देसाई यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाच्या शेवटी आंदोलकांच्या वतीने तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
फोटो कॅप्शन :
गारगोटी येथे जंतरमंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button