अबब! ५० फुटांत ३०० खड्डे; मडीलगे बुद्रुक-गारगोटी खिंड रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा ग्रामस्थ, वाहनधारक व प्रवाशांचा संताप;

अबब! ५० फुटांत ३०० खड्डे; मडीलगे बुद्रुक-गारगोटी खिंड रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा
ग्रामस्थ, वाहनधारक व प्रवाशांचा संताप;
गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
“रस्ता आहे की खड्ड्यांचा पट्टा?” असा संतप्त सवाल आज मडीलगे बुद्रुक-गारगोटी खिंड मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. भुदरगड तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा हा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून, अवघ्या ५० फुटांच्या अंतरात तब्बल ३०० हून अधिक खड्डे पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी हा मार्ग आता अपघाताला निमंत्रण देणारा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारा ठरत आहे.
पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
लोकसंख्येने मोठ्या असलेल्या मडीलगे बुद्रुक गावाला जोडणाऱ्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहन चालवताना रस्ता कुठे संपतो आणि खड्डा कुठे सुरू होतो, हेच समजत नसल्याने चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. अनेक वाहनांचे टायर, सस्पेन्शन व इतर यांत्रिक भाग खराब होत असल्याने वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे.
मुरगूड-गारगोटी मार्गावरील हा खिंड रस्ता महापुराच्या काळात पर्यायी मार्ग म्हणून हजारो नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरतो. दौलत विद्या मंदिर तसेच परिसरातील विविध शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी, अंगणवाडीतील चिमुकले, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यापारी, दूध उत्पादक तसेच पोलीस व लष्कर भरतीसाठी सराव करणारे युवक दररोज या रस्त्याचा वापर करतात. मात्र, या सर्वांनाच आता जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिकांच्या मते, रस्त्यालगत गटारींचे योग्य नियोजन नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचते. त्यामुळे डांबरीकरण वारंवार उखडून जात असून दरवर्षी हीच समस्या निर्माण होते. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
“या रस्त्याची पुढील १५ दिवसांत तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती सुरू झाली नाही, तर ग्रामस्थ, वाहनधारक व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
एखादा मोठा अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने तातडीने या मार्गाची पाहणी करून कायमस्वरूपी दर्जेदार डांबरीकरण करावे, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी गटारींची व्यवस्था करावी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ, वाहनधारक आणि प्रवासी वर्गातून होत आहे.
फोटो कॅप्शन :
मडीलगे बुद्रुक-गारगोटी खिंड मार्गावरील रस्त्याची भीषण अवस्था. ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि जीव धोक्यात घालून मार्ग काढणारे वाहनचालक; तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी.
