ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने गारगोटी दुमदुमली! गारगोटी हायस्कूलच्या भव्य वारकरी दिंडीने जपली भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरा

ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने गारगोटी दुमदुमली!
गारगोटी हायस्कूलच्या भव्य वारकरी दिंडीने जपली भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरा
गारगोटी | सिंहवाणी ब्युरो :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य वारकरी दिंडीने शनिवारी संपूर्ण गारगोटी शहर भक्तिमय वातावरणात रंगून गेले. टाळ-मृदंगाचा गजर, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषासह विठ्ठल नामस्मरणाने शहर दुमदुमून गेले. संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, पारंपरिक वेशातील विद्यार्थिनी, आकर्षक पालखी, रथ आणि नयनरम्य रिंगण सोहळ्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडवत भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दिंडीला पालक, नागरिक आणि वारकरी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिंडीमुळे संपूर्ण गारगोटी शहर विठ्ठलमय झाले होते.
पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथामध्ये विठ्ठल-रखुमाई तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह विविध संतांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हुतात्मा क्रांती चौक, बाजारपेठ, महादेव मंदिर चौक, आबिटकर कॉम्प्लेक्स आणि श्री साई मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिस्तबद्ध व आकर्षक रिंगण सोहळा हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. हा सोहळा पाहण्यासाठी अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. मार्गावरील विविध ठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले. विठ्ठल मंदिरातील भावपूर्ण महाआरतीने दिंडीचा समारोप झाला.
दिंडीचा शुभारंभ ह.भ.प. राम कळंबेकर व ह.भ.प. दत्तात्रय घुंगुरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई, युवा नेते प्रतापसिंह प्रकाश आबिटकर, सरपंच प्रकाश वास्कर, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन बजरंग कुरळे, भाजयुमो प्रदेश सचिव अल्केश कांदळकर तसेच शिवसेना शहरप्रमुख रणधीर शिंदे यांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले.
समाजातील विविध घटकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. विठ्ठल भजनी मंडळाने सहभागी विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप केले. त्रिमूर्ती फर्निचर मॉलने विद्यार्थ्यांना टोप्या व लाडूंचे वाटप केले, तर ‘फ्रेंड्स ऑफ विक्रमसिंह’ ग्रुपनेही विद्यार्थ्यांना लाडूंचे वाटप करून उपक्रमात सहभाग नोंदविला.
या प्रसंगी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, विभागप्रमुख आर. पी. गव्हाणकर, पी. पी. भंडारी, अजित साळवी, युवराज शिगावकर, सौ. आर. आर. बहादुरे, सौ. सुनीता पाटील, बी. के. इंगळे, राजेश गिलबिले, धीरज मेंगाणे, विद्याधर परीट, सौ. राजवी साठे, प्रा. सौ. रोहिणी निकम, प्रा. सौ. स्नेहा साळोखे, सौ. एल. आर. पाळेकर, संतोष पाटील, ऋषिकेश गव्हाणकर, शुभम कोकाटे, श्रावणी मोरे, श्रेया घोडके, निवृत्त मुख्याध्यापक आर. वाय. देसाई, बी. ए. डावरे, अमृत देसाई, श्रीपती चव्हाण, विजय स्मार्त, नामदेव शिंदे, सौ. मंगल कांबळे, उत्तम अस्वले, विश्वास केणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नामदेव शिंदे (मडीलगे बुद्रुक), विजय पाटील, सत्यजित मुगडे, प्रसाद वायदंडे, रणजित कल्याणकर, रणजित देसाई, शिवाजी भराडे, अजित शिंदे आणि सार्थक परुळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
गारगोटी हायस्कूलच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान जागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले. शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार देणारी संस्था म्हणून गारगोटी हायस्कूलने पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख अधोरेखित केली.