जिल्हाताज्या घडामोडी

अर्जुनी गाव : सायबर सुरक्षित गाव’ उपक्रमाचा उत्साहात उद्घाटन समारंभ

अर्जुनी गाव : सायबर सुरक्षित गाव’ उपक्रमाचा उत्साहात उद्घाटन समारंभ


निपाणी / सिंहवाणी ब्युरो :
देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर आणि क्विक हील फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत देवचंद महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर क्लबमार्फत ‘अर्जुनी गाव : सायबर सुरक्षित गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्घाटन समारंभ अर्जुनी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, डिजिटल सेवा, सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर सायबर फसवणूक, ऑनलाइन आर्थिक गुन्हे, बनावट लिंक, फिशिंग, ओटीपी फसवणूक, सोशल मीडिया गैरवापर आणि डिजिटल गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करून अर्जुनी गावाला सायबर सुरक्षित गाव बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या कार्यक्रमामध्ये देवचंद महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर क्लबचे समन्वयक प्रा. प्रशांत कुंभार यांनी  कार्यक्रमासाठी उपस्थित पदाधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांना ‘अर्जुनी गाव : सायबर सुरक्षित गाव’ या उपक्रमाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजना तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली.

या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, संशयास्पद फोन कॉल व संदेश, बनावट लिंक, ओटीपी व यूपीआय पिनची सुरक्षितता, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षा, ऑनलाइन आर्थिक व्यवहारातील दक्षता आणि सायबर गुन्हा घडल्यास तातडीने करावयाच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सायबर वॉरियर्सच्या माध्यमातून गावातील नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे.

यावेळी सायबर वॉरियर क्लबमध्ये नव्याने निवड झालेल्या सायबर वॉरियर्सना श्री. कुलदीप बोंगे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कागल यांच्या हस्ते सायबर वॉरियर बॅज प्रदान करण्यात आले. नव्या सायबर वॉरियर्सनी गावामध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी स्वीकारली.

या कार्यक्रमास श्री. कुलदीप बोंगे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कागल; श्री. प्रमोदकुमार तारळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कागल; श्री. निवृत्ती जमदाडे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कागल; श्री. प्रविणसिंह सुळकूडे, ग्रामपंचायत अधिकारी, अर्जुनी; सरपंच श्री. बापुसो रामा यादव; उपसरपंच श्री. सुदाम दत्ताजीराव देसाई; माजी उपसरपंच श्री. सुनील यशवंतराव देसाई यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, सायबर वॉरियर क्लबचे पदाधिकारी, सायबर वॉरियर्स आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

‘अर्जुनी गाव : सायबर सुरक्षित गाव’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. आशिषभाई शाह आणि उपाध्यक्षा मा. सौ. तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच देवचंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. रमेश साळुंखे आणि संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. स्वप्नील पोतदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button