जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गड बिद्रीत पाझर तलाव फुटला; पाण्याचा प्रचंड लोंढा, भातशेतीचे मोठे नुकसान, अनर्थ टळला

गड बिद्रीत पाझर तलाव फुटला; पाण्याचा प्रचंड लोंढा, भातशेतीचे मोठे नुकसान, अनर्थ टळला

गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
मुसळधार पावसामुळे गड बिद्री परिसरातील पाझर तलावाचा बंधारा शुक्रवारी सकाळी अचानक फुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तलावातील पाण्याचा प्रचंड लोंढा खालील शिवारात घुसल्याने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले. सुदैवाने, घटनेच्या वेळी शेतात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 


पाझर तलाव फुटताच पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले. तलावातील माती, दगडगोटे आणि मोठ्या प्रमाणातील गाळ पाण्यासोबत शेतात वाहून गेला. त्यामुळे भात लागवड केलेली अनेक शेते गाळाखाली दडपली गेली, तर काही ठिकाणी सुपीक जमीनच वाहून गेली आहे.
रोपलावणी पूर्ण झाल्याने अनर्थ टळला
भात रोपलावणीचा हंगाम नुकताच संपल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीची कामे आवरली होती. त्यामुळे घटनेच्या वेळी शेतात मजूर किंवा शेतकरी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून अनेकांना पुन्हा लागवड करण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे.
प्रशासन घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाझर तलावाच्या बंधाऱ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मारुती देऊलकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रशासनाकडून नुकसानीचा अंतिम अहवाल येणे बाकी असून, पंचनाम्यानंतर नुकसानभरपाईबाबत निर्णय अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button