जिल्हाताज्या घडामोडी

शर्यतीच्या मुक्या बैलांच्या वेदना शर्यत शौकिनांनी समजून घ्यायला हव्यात” – ग्रामीण कथाकार संजय खोचारे; वर्षा व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

“शर्यतीच्या मुक्या बैलांच्या वेदना शर्यत शौकिनांनी समजून घ्यायला हव्यात”

– ग्रामीण कथाकार संजय खोचारे; वर्षा व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

वारणानगर / सिंहवाणी ब्युरो :
वारणानगर येथील श्री शारदा वाचन मंदिराच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित ‘वर्षा व्याख्यानमाले’चे तिसरे पुष्प ग्रामीण साहित्याचा सुगंध, बोलीभाषेचे सौंदर्य आणि शेतकरी जीवनाचे वास्तव यांचा संगम घडवित उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व कथाकथनकार संजय खोचारे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण शैलीत कथाकथन सादर करून उपस्थितांना भावविश्वाच्या अनोख्या प्रवासाला नेले.
यावेळी त्यांनी ‘जायपं’ आणि ‘वादाड’ या दोन ग्रामीण कथांचे प्रभावी कथाकथन केले. त्यांच्या ओघवत्या बोलीभाषेतील सादरीकरणामुळे सभागृहात अनेकदा टाळ्यांचा कडकडाट झाला, तर हृदयस्पर्शी प्रसंगांनी अनेक श्रोते भावूक झाले.
कथाकथनादरम्यान संजय खोचारे म्हणाले, “ग्रामीण भागातील अर्थकारण आजही शेती आणि गुराढोरांवर अवलंबून आहे. शेतकऱ्याच्या कष्टाइतकेच त्याच्या जनावरांचेही योगदान मोठे आहे. गोठ्यातील गाय-वासरांची भाषा आणि त्यांचे भावविश्व केवळ खऱ्या शेतकऱ्यालाच समजू शकते. शर्यतीसाठी जुंपल्या जाणाऱ्या मुक्या बैलांच्या वेदना आणि त्यांचा त्रास शर्यतीचे शौकीन असलेल्या प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे.”
त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती आणि पशुपालनाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन करत ग्रामीण संस्कृती, कष्टाचे मोल, जनावरांवरील प्रेम आणि गावाकडची माणुसकी जपण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात ग्रामीण साहित्य समाजाला अधिक संवेदनशील आणि संस्कारक्षम बनविण्याचे मोठे कार्य करत असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांनी करून दिला.
यावेळी वारणा दूध संघाचे चेअरमन एच. आर. जाधव, प्रमोदराव कोरे, बी. बी. दोशिंगे, जगन्नाथ चरापले, एम. बी. मलमे, शिवाजी पाटील, शिवाजी जंगम, प्रमोद पाटील, संभाजी कणसे, विद्या पाटील, अश्विनी पाटील, पूनम केकरे यांच्यासह परिसरातील साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण साहित्याचा गंध, बोलीभाषेचे सौंदर्य आणि शेतकरी जीवनाचे वास्तव यांचे प्रभावी चित्रण घडवून आणणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना अनेक रसिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button