आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर : अपेक्षांची नवी जबाबदारी, विकासाची नवी संधी – डॉ. सुभाष के. देसाई | विशेष लेख – सिंहवाणी

आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर : अपेक्षांची नवी जबाबदारी, विकासाची नवी संधी
– डॉ. सुभाष के. देसाई | विशेष लेख – सिंहवाणी
भुदरगड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. प्रकाश आबिटकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही केवळ एका व्यक्तीच्या राजकीय प्रवासातील यशोगाथा नसून, भुदरगड–राधानगरीसह संपूर्ण ग्रामीण भागाच्या विकासासाठी उघडलेले नवे पर्व आहे. त्यामुळे या निवडीचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन करणे ही प्रत्येक नागरिकाची भावना आहे.
सोनाळीसारख्या छोट्याशा गावातून राजकारणात पदार्पण करून आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. सामान्य कुटुंबातील युवक जिद्द, मेहनत आणि लोकसंपर्काच्या बळावर राज्याच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेत सहभागी होतो, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
ना. प्रकाश आबिटकर यांचे वडील श्री. आनंदराव आबिटकर हे बिद्री साखर कारखान्यातील लढाऊ कामगार नेते आणि डाव्या विचारसरणीचे अभ्यासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यामुळे आबिटकर कुटुंबाकडे अनेक वर्षे एका विशिष्ट वैचारिक दृष्टिकोनातून पाहिले गेले. प्रकाश आबिटकर यांच्या राजकीय प्रवासात काळानुरूप बदल झाले; परंतु लोकशाही व्यवस्थेत विचार, भूमिका आणि जबाबदाऱ्या बदलत असतात. शेवटी जनतेच्या हितासाठी केलेले कामच एखाद्या लोकप्रतिनिधीचे खरे मूल्यमापन ठरवत असते.
आज पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी गारगोटी, भुदरगड आणि राधानगरी परिसराच्या विकासासाठी विविध उपक्रमांना गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वाकडून जनतेच्या अपेक्षाही अधिक वाढल्या आहेत.
याच अनुषंगाने एक जुनी आठवण आवर्जून सांगावीशी वाटते. कैलासवासी दिग्विजय खानविलकर आरोग्यमंत्री असताना सीपीआर रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया विभाग सुरू झाला होता. त्या वेळी एका पत्रकार परिषदेत हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. कोल्हे यांनी अत्यंत मोलाची बाब मांडली होती. त्यांनी सांगितले होते की, अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे हा विकासाचा केवळ पहिला टप्पा आहे. त्या सुविधा प्रभावीपणे चालविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी, नियमित देखभाल आणि सातत्यपूर्ण आर्थिक तरतूद तितकीच आवश्यक असते.
पुढे आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे हा विभाग काही काळ बंद ठेवण्याची वेळ आली. आरोग्य व्यवस्थेतील हा अनुभव आजही धोरणकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहे. केवळ भव्य इमारती आणि महागडी यंत्रसामग्री उभारून आरोग्यसेवा सक्षम होत नाही; त्यासाठी सक्षम मनुष्यबळ, सातत्यपूर्ण निधी आणि परिणामकारक प्रशासन यांचीही गरज असते.
गारगोटी येथे उभारण्यात आलेले शंभर खाटांचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय हा निश्चितच या भागासाठी मोठा टप्पा आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली आहेत. मात्र या सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, प्रशिक्षित परिचारिका व कर्मचारी, पुरेसा औषधसाठा, उपकरणांची नियमित देखभाल आणि आवश्यक आर्थिक तरतूद यावर विशेष भर देणे आवश्यक आहे.
आरोग्य ही केवळ सुविधा नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचे मोठे आव्हान आजही कायम आहे. त्या आव्हानाला उत्तर देण्याची ऐतिहासिक संधी ना. प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वासमोर उभी आहे.
सिंहवाणीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या कार्यकाळात भुदरगड–राधानगरीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्यसेवेला नवी दिशा, नवी गती आणि नवी गुणवत्ता प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांच्या यशस्वी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.