क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

म्हाकवेत वीज कोसळून २८ वर्षीय रणजीतचा मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत काळाचा घाला

म्हाकवेत वीज कोसळून २८ वर्षीय रणजीतचा मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत काळाचा घाला

सिंहवाणी ब्युरो | म्हाकवे
म्हाकवे (ता. कागल) आई-वडिलांसोबत शेतात राबून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या २८ वर्षीय रणजीत सिद्राम पाटील याचा अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पठारावरील शेतात ही हृदयद्रावक घटना घडली. वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने म्हाकवे गावावर शोककळा पसरली आहे.

वीज कोसळली अन् क्षणात होत्याचे नव्हते!

परिसरात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने रणजीत दुपारी आई-वडिलांसोबत शेतात काम करण्यासाठी गेला होता. सायंकाळी रणजीत आणि त्याचे वडील शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली. विजेचा जोरदार आघात झाल्याने रणजीतच्या कपड्यांनी पेट घेतला. या अवस्थेत तो वडिलांच्या दिशेने सुमारे १५ ते २० फूट धावत गेला; मात्र विजेच्या आघातामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

डोळ्यांदेखत मुलावर ओढवलेला हा प्रसंग पाहून वडिलांना मोठा धक्का बसला. काही क्षणांपूर्वी शेतात काम करणारा मुलगा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि ग्रामस्थ सुन्न झाले.

कुटुंबाचा आधार हरपला!

रणजीत अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. घरातील एकुलता मुलगा आणि कुटुंबाचा आधार असलेल्या रणजीतच्या अकाली निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांसोबत शेतात कष्ट करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या रणजीतच्या जाण्याने कुटुंबाच्या आधारालाच मोठा धक्का बसला आहे.

मनमिळाऊ स्वभावाच्या रणजीतच्या आठवणींनी गाव हळहळले

रणजीतचा स्वभाव मनमिळाऊ होता. कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या या तरुणाचा अवकाळी पावसात झालेला दुर्दैवी मृत्यू ग्रामस्थांच्या मनाला चटका लावणारा ठरला आहे. मुलाच्या भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या आई-वडिलांवर नियतीने घातलेल्या या घावाने त्यांचे जगच उद्ध्वस्त झाले आहे. रणजीतच्या निधनाने म्हाकवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button