ताज्या घडामोडी

रजोनिवृत्तीबाबतचे समज-गैरसमज दूर करण्यासाठी गारगोटीत जनजागृती! रॅलीसह व्याख्यानाचे आयोजन; महिलांच्या आरोग्याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

रजोनिवृत्तीबाबतचे समज-गैरसमज दूर करण्यासाठी गारगोटीत जनजागृती!

रॅलीसह व्याख्यानाचे आयोजन; महिलांच्या आरोग्याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
जागतिक रजोनिवृत्ती दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी यांच्या वतीने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्या संकल्पनेतून आणि जेबेलीना नर्सिंग कॉलेज, गारगोटी यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला.

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात होणारे बदल, त्याविषयी योग्य माहिती आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने गारगोटी शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात रजोनिवृत्तीविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समुपदेशक जयवंत सावंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. सविता शेट्टी आणि डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी पेरीमेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीपूर्व काळ आणि मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती या टप्प्यांविषयी सविस्तर माहिती दिली. या काळात महिलांच्या शरीरात होणारे बदल, जाणवणारी लक्षणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांनी रजोनिवृत्तीबाबत समाजात प्रचलित असलेले विविध समज आणि गैरसमज यांवर प्रकाश टाकला. रजोनिवृत्ती ही महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक अवस्था असून, या काळात उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, रजोनिवृत्तीविषयी असलेली संकोचाची भावना दूर करणे आणि या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमाला जेबेलीना नर्सिंग कॉलेजच्या शिक्षिका स्मिता गुरव, उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button