जिद्दीला आत्मविश्वासाची जोड; तेजस्विनीची KEM रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी निवड! जन्मतः सेरेब्रल पाल्सीचे आव्हान; जिद्द, शिक्षण आणि सकारात्मकतेच्या बळावर तेजस्विनीची शैक्षणिक भरारी

जिद्दीला आत्मविश्वासाची जोड; तेजस्विनीची KEM रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी निवड!
जन्मतः सेरेब्रल पाल्सीचे आव्हान; जिद्द, शिक्षण आणि सकारात्मकतेच्या बळावर तेजस्विनीची शैक्षणिक भरारी
सिंहवाणी ब्युरो | वसमत
जन्मतःच सेरेब्रल पाल्सीसारख्या आव्हानाला सामोरे जावे लागले, बालपणी गंभीर प्रकृतीमुळे अतिदक्षता विभागात ११ दिवस घालवावे लागले; मात्र या प्रतिकूल परिस्थितीपुढे हार न मानता जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कु. तेजस्विनी मनिषा मिलिंद शिवभगत हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालयात बीपीटीएच (Bachelor of Physiotherapy) या फिजिओथेरपी पदवी अभ्यासक्रमासाठी तिची निवड झाली आहे. तेजस्विनीच्या या यशामुळे वसमत परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संकटांशी झुंज देत यशाकडे वाटचाल
तेजस्विनीचा जन्म २००८ मध्ये झाला. जन्मानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला ११ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. नांदेड येथील मराठवाडा हॉस्पिटलमध्ये डॉ. संग्राम जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार करण्यात आले. पुढील काळातही तिला अनेक आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मुलीच्या क्षमतेवर विश्वास ठेवत तिचे पालक मिलिंद आणि मनीषा शिवभगत यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून तिच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले.
योग्य उपचार, संतुलित आहार, व्यायाम आणि आवश्यक वैद्यकीय देखभाल यांसोबत तेजस्विनीच्या शारीरिक व मानसिक क्षमतांच्या विकासावर भर देण्यात आला. तिने कराटे आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षणही घेतले. संतोष नांगरे यांच्या शाओलिन कराटे अकॅडमीत दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्यामुळे तिच्या आत्मविश्वासाला बळ मिळाले. पुढे डॉ. राजेंद्र पाटील यांच्या फिजिओथेरपी क्लिनिकमध्येही तिने उपचार घेतले.
शिक्षणातही चमकदार कामगिरी
तेजस्विनीने इंदिरानगर लिंगी, ता. वसमत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथून दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. मॉडर्न कॉलेज, वसमत येथून विज्ञान शाखेचे शिक्षणही तिने प्रथम श्रेणीत पूर्ण केले. पुढे नांदेड येथे दोन वर्षे नीट परीक्षेची तयारी केली.
आरोग्यविषयक आव्हाने असूनही शिक्षणात सातत्य राखण्याची तिची जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा या यशात महत्त्वाची ठरली.
स्वतःच्या अनुभवातून इतरांना सक्षम करण्याचे ध्येय
सेरेब्रल पाल्सी असलेल्या व्यक्तींना सक्षम बनविणे, त्यांच्या शारीरिक क्षमतांचा विकास करणे आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मदत करणे, हे तेजस्विनीचे ध्येय आहे. स्वतःच्या जीवनातील अनुभवातून तिने फिजिओथेरपी क्षेत्राची निवड केली. KEM रुग्णालयात प्रवेश मिळाल्यामुळे तिच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
तेजस्विनीचे यश हे केवळ एका विद्यार्थिनीचे शैक्षणिक यश नसून, प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून त्यांना योग्य संधी आणि पाठबळ दिल्यास ते किती मोठी झेप घेऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
पालकांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे फलित
तेजस्विनीच्या या यशामागे तिची जिद्द, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आई-वडिलांचे निस्सीम प्रेम व समर्पण आहे. अडचणींकडे मर्यादा म्हणून न पाहता त्यांवर मात करण्याची प्रेरणा देणाऱ्या तिच्या पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे.
मुलींनी शिक्षणाची कास धरून स्वावलंबी, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवावे, असा संदेश तेजस्विनीच्या यशातून मिळतो. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मिलिंद आळणे, मित्रमंडळी, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
तेजस्विनीची ही भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली असून, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर आव्हानांवर मात करता येते, हे तिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.