अथणी शुगरचा शेतकऱ्यांना दिलासा! पहिला हप्ता ३,९०० रुपये प्रतिटन बँक खात्यात जमा ऊस बिलासोबत तोडणी-वाहतुकीचे पैसेही जमा;

अथणी शुगरचा शेतकऱ्यांना दिलासा! पहिला हप्ता ३,९०० रुपये प्रतिटन बँक खात्यात जमा
ऊस बिलासोबत तोडणी-वाहतुकीचे पैसेही जमा;
सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच अथणी शुगर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणारे पाऊल उचलले आहे. कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसाचे बिल प्रतिटन ३,९०० रुपये दराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. विशेष म्हणजे ऊस बिलासोबतच तोडणी व वाहतूक खर्चाची रक्कमही जमा करण्यात आली आहे. त्यामुळे भुदरगडसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वेळेत बिल, शेतकऱ्यांना आर्थिक बळ!
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. मात्र अथणी शुगरने पहिल्याच पंधरवड्याचे बिल वेळेत अदा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. वेळेवर पैसे मिळाल्याने शेतीची पुढील कामे, ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या खर्चाचे नियोजन करणे शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.
ऊस बिलाबरोबर तोडणी व वाहतुकीची रक्कमही जमा झाल्याने मुकादम, ऊसतोड कामगार तसेच ट्रॅक्टर व ट्रकधारकांनाही आर्थिक दिलासा मिळाला आहे. यामुळे ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला हेच ध्येय!
यावेळी कारखान्याचे जॉईंट एमडी योगेश पाटील म्हणाले, “अथणी शुगर हा शेतकऱ्यांचाच कारखाना आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, हीच आमची भूमिका आहे. पहिला हप्ता प्रतिटन ३,९०० रुपये दराने ऊस बिलासह तोडणी व वाहतुकीचे बिलही जमा केले आहे. वेळेत बिल देण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवू.”
तसेच सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला जास्तीत जास्त ऊस अथणी शुगर कारखान्याकडे गळितासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखाना प्रशासनाची उपस्थिती
यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास श्रीमंत पाटील, चीफ इंजिनिअर नामदेव भोसले, चीफ केमिस्ट प्रकाश हेंदुरे, चीफ अकाउंटंट जमीर मकानदार, शेती अधिकारी राजाराम आमते, कार्यालय अधीक्षक बाबासाहेब देसाई यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
दराची चांगली घोषणा आणि पहिल्याच पंधरवड्यात प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झालेले बिल यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांचा अथणी शुगरकडे कल वाढण्याची चिन्हे आहेत.
✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज