जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेष

गारगोटीतील रस्त्यानी घेतला मोकळा श्वास! २० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अतिक्रमणांवर अखेर हातोडा; बसस्थानक परिसर झाला मोकळा! : उपअभियंता महेश कांजर यांच्या खंबीर भूमिकेचे कौतुक

गारगोटीतील रस्त्यानी घेतला मोकळा श्वास! २० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अतिक्रमणांवर अखेर हातोडा; बसस्थानक परिसर झाला मोकळा!

खोकीधारकांनी स्वतःहून हटविली खोकी; कोणताही वाद न होता शांततेत मोहीम यशस्वी! उपअभियंता महेश कांजर यांच्या खंबीर भूमिकेचे कौतुक

सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
गारगोटी शहरातील अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या मुख्य रस्त्याने आणि बसस्थानक परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला! तब्बल २० वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर गोंजारी हॉस्पिटल, बसस्थानक परिसर ते इंजूबाई मंदिर या मार्गावरील अतिक्रमणे गुरुवारी हटविण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या कारवाईपूर्वीच खोकीधारकांनी स्वतःहून आपली खोकी हटविल्याने ही मोहीम कोणताही विरोध, वादावादी किंवा तणाव न होता शांततेत पार पडली. अनेक वर्षांपासून अतिक्रमणांमुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा झाल्याने गारगोटीकर नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

गारगोटी शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर होता. बसस्थानक परिसर, मुख्य रस्ता आणि सार्वजनिक जागांवरील खोक्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत होती. या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाली, निवेदने दिली गेली; मात्र प्रत्यक्ष कारवाई मात्र विविध कारणांमुळे रखडत होती.

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारचा दिवस अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी निश्चित करून संबंधित खोकीधारकांना पूर्वसूचना दिली. त्यानंतर बुधवारी रात्रीपासूनच काही खोकीधारकांनी आपली खोकी हटविण्यास सुरुवात केली. गुरुवारी सकाळी इतरांनीही स्वतःहून खोकी काढून घेतली. प्रशासनाने कारवाईसाठी जेसीबी आणि ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर सज्ज ठेवला होता. मात्र, खोकीधारकांनी स्वतःहून सहकार्य केल्यामुळे यंत्रसामग्रीचा वापर करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे संभाव्य नुकसान आणि संघर्ष टळला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर यांच्या नेतृत्वाखाली विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविल्याने संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली.

अतिक्रमण हटताच बसस्थानकाचे विस्तीर्ण रूप दृश्यमान!

अतिक्रमणांच्या आड वर्षानुवर्षे झाकले गेलेले गारगोटी बसस्थानक आता मोकळे आणि विस्तीर्ण दिसू लागले आहे. खोकी हटविल्यानंतर बसस्थानक परिसराचे बदललेले रूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक वर्षांनंतर परिसर मोकळा झाल्याने नागरिकांमध्ये कुतूहल आणि समाधानाचे वातावरण होते. रस्त्यावरील अडथळे दूर झाल्याने वाहतुकीलाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

२००६ पासूनचा पाठपुरावा अखेर यशस्वी!

गारगोटीतील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांनी २० वर्षांच्या पाठपुराव्याचा इतिहास स्पष्ट केला.

ते म्हणाले, “गारगोटी शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी आम्ही २००६ पासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे वारंवार पत्रव्यवहार करून अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. यापूर्वी दोन वेळा अतिक्रमण हटविण्याचे प्रयत्न झाले; मात्र मोहीम पूर्णत्वास जाऊ शकली नाही.

२०२० मध्ये पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. अवघ्या एका दिवसात ही मोहीम हुतात्मा चौकापर्यंत पोहोचली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी कोरोना टाळेबंदी लागू झाल्याने कारवाई थांबली. त्यानंतरही हा विषय सोडला नाही. दोन वर्षांनंतर पुन्हा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. आज प्रत्यक्ष अतिक्रमण हटविले जात असल्याचे पाहून मनापासून समाधान वाटत आहे.

हा कोणाच्याही विरोधाचा विषय नाही. हा गारगोटी शहराच्या विकासाचा, वाहतूक सुरळीत करण्याचा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवून देण्याचा प्रश्न आहे. ही कारवाई कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शकपणे आणि कायमस्वरूपी पूर्ण झाली पाहिजे,” अशी अपेक्षाही आबिटकर यांनी व्यक्त केली.

उपअभियंता महेश कांजर यांच्या खंबीर भूमिकेचे कौतुक!

गारगोटी शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि विविध अडचणींमुळे यापूर्वी अनेकदा कारवाई रखडली होती. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर यांनी ठाम भूमिका घेत नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविली. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागला. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, सिंहवाणीनेही गारगोटीतील अतिक्रमण हटविण्याचा प्रश्न सातत्याने मांडला होता. प्रशासनाच्या कारवाईची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आता प्रत्यक्ष मोहीम यशस्वी झाली आहे.

अतिक्रमण हटविणे ही केवळ एका दिवसाची कारवाई ठरू नये. मोकळ्या झालेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. गारगोटीच्या नियोजनबद्ध विकासासाठी, स्वच्छ आणि मोकळ्या रस्त्यांसाठी ही मोहीम कायमस्वरूपी प्रभावी ठरावी, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.

जनतेची मागणी, प्रशासनाची ठाम भूमिका आणि खोकीधारकांचे सहकार्य यांचा सुंदर संगम घडला आणि अखेर गारगोटीकरांना मोकळा रस्ता मिळाला!

✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज निर्भीड • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button