जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगचा नवा फ़ंडा ; भुदरगडमध्ये मध्यरात्री ड्रोनच्या घिरट्या! दिवसा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, आता रात्री बारानंतर शेतशिवाराचे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगचा नवा फ़ंडा ; भुदरगडमध्ये मध्यरात्री ड्रोनच्या घिरट्या!

दिवसा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, आता रात्री बारानंतर शेतशिवाराचे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सिंहवाणी ब्युरो / रमेश पाटील, गारगोटी :
शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगवरून भुदरगड तालुक्यात निर्माण झालेला संघर्ष आता नव्या वळणावर पोहोचला आहे. दिवसा शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे मोजणी पथकाला माघार घ्यावी लागत असताना, आता रात्रीच्या अंधारात ड्रोनद्वारे शेतजमिनींचे सर्वेक्षण सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. म्हसवे, दारवाड, निळपण, कोनवडे आणि नाधवडे परिसरात गेल्या दोन रात्री साधारण मध्यरात्री बारानंतर ड्रोन घिरट्या घालताना दिसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहाटेच्या मोजणीला विरोध, आता मध्यरात्री ड्रोनची चर्चा!

दि. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगसाठी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोनार्क कंपनीचे पथक भुदरगड तालुक्यातील शेतशिवारात दाखल झाले होते. म्हसवे, निळपण, दारवाड, नाधवडे आणि कोनवडे परिसरात मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न होताच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले.

आमच्या संमतीशिवाय शेतजमिनींची मोजणी कशी करता, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. कोनवडे येथे मोजणीसाठी वापरण्यात येणारे ट्रायपॉड स्टँड पेटविण्यात आले. काही ठिकाणी मोजणी साहित्याची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने मोजणी पथकाला माघार घ्यावी लागली.

या घटनांनंतरही शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना आता रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याचा प्रकार समोर आल्याने संशय आणि संभ्रम वाढला आहे.

पाच गावांच्या शिवारात ड्रोन दिसल्याचा दावा!

म्हसवे, दारवाड, निळपण, कोनवडे आणि नाधवडे या गावांच्या परिसरात रात्री साधारण १२ वाजण्याच्या सुमारास ड्रोन फिरताना दिसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत? त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष मॅपिंग सुरू आहे का? शेतजमिनींची छायाचित्रे किंवा अन्य माहिती संकलित केली जात आहे का? याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

दिवसा शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोजणीचे काम थांबले असताना रात्रीच्या वेळी अशा हालचाली कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

सरपंच सर्जेराव देसाई यांचा सरकारला इशारा!

म्हसवेचे सरपंच सर्जेराव देसाई यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी विरोध करून मॅपिंगचे काम बंद पाडले असताना प्रशासन रात्री ड्रोनद्वारे सर्वेक्षण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

भुदरगड हा क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकारची हिटलरशाही हाणून पाडल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सुपीक जमिनी आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न!

शक्तीपीठ महामार्गामुळे भुदरगड तालुक्यातील सुपीक शेती, बागायती क्षेत्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या आक्षेपांचे निराकरण करण्याऐवजी मॅपिंगचा आग्रह का धरला जात आहे, असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित होत आहे.

प्रशासनाने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत!

* रात्री ड्रोन उडविण्याचे आदेश नेमके कोणी दिले?

* ड्रोन सर्वेक्षणासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे का?

* कोणती कंपनी किंवा शासकीय यंत्रणा हे काम करत आहे?

* ड्रोनद्वारे केवळ छायाचित्रण सुरू आहे की प्रत्यक्ष जमीन मॅपिंग केले जात आहे?

* संकलित केलेली माहिती कोणत्या विभागाकडे जमा होणार आहे?

* शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे?

या प्रश्नांवर जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांनी खुलासा करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांचा विरोध डावलून प्रकल्प पुढे रेटणार की त्यांच्याशी संवाद साधणार?

भुदरगडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगवरून सुरू असलेला संघर्ष आता केवळ मोजणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो शेतकऱ्यांच्या जमिनीचा, अस्तित्वाचा आणि लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडण्याच्या अधिकाराचा प्रश्न बनला आहे.

मध्यरात्री ड्रोन फिरत असल्याच्या आरोपांची प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा, हीच अपेक्षा!

सिंहवाणीचा सवाल : दिवसा विरोध झुगारता येत नाही, मग रात्रीच्या अंधारात ड्रोनद्वारे मॅपिंग करण्याची गरज का?

✍️ संपादक : किशोर आबिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button