ताज्या घडामोडी

बेटी बचाओ अभियान जन चळवळ होण्यासाठी प्रा. कुराडे यांचे योगदान – कुलगुरू डॉ. शिर्के

बेटी बचाओ अभियान जन चळवळ होण्यासाठी प्रा. कुराडे यांचे योगदानकुलगुरू डॉ. शिर्के

सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज

प्रा. किसनराव कुराडे-पाटील लिखित चिंगीचा माईंडसेट, भ्रूणकन्येचा आत्मध्वनी, चिंगीची भरारी, बिटिया का जीवनदान पत्र, आई… दार उघड…. आदी पुस्तकांच्या माध्यमातून प्रा. कुराडे यांनी बेटी बचाओ अभियान राबविण्यासाठी खÚया अर्थाने योगदान दिले आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून ही लोकचळवळ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर पोहोचेल असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला.

स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते, तर…!!, गुरुकुलातील कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार काळ आणि कर्तृत्व, आत्मदर्शन, शिक्षणशाईल व्ही. टी. पाटील काळ आणि कर्तृत्व, जीवनदान यज्ञ आदी पुस्तकांचे प्रकाशन बेटी बचाव अभियान, विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठ, शिवराज विद्या संकुल व वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाला. या पुस्तकांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे] प्रा. किसनराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, वाचनकट्टाचे अध्यक्ष युवराज कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. कुराडे यांनी आपल्या चिंतनातुन अनेक सामाजिक विषयांवर अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहे. विशेषता स्त्रीभ्रूणहत्या सारख्या संवेदनशील विषयावर जवळवजळ सहा पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. यामध्ये नाटिका, संवाद, कथानक आदी प्रकार आहेत. या पुस्तकांना शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाव अभियान व विद्यार्थी विकास मंडळाने पुरस्कृत केले आहे.

या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांच्या ग्रंथालयाना प्रातिनीधिक स्वरूपात प्रा. कुराडे यांनी लिहिलेल्या दहा पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

यावेळी डॉ.. शिर्के म्हणाले विद्यापीठ हे महिलांच्या बाबतीतील धोरणे विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असून, महिला धोरण बळकट करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

विद्यापीठातील सर्व क्षेत्रामध्ये महिला सक्षमपणे कार्यरत आहेत. महिलांसाठी विद्यापीठाने लोकस्मृती वसतीगृह योजना अंमलात आणण्याकरिता वैशिष्टयपूर्ण योजना आखली आहे या योजनेत विद्यापीठ कार्यक्षेत्राच्या समाजातील घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. प्रा. किसनराव कुराडे हे कमवा व शिका योजनेतून घडलेले माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला आहे.

प्रा. किसनराव कुराडे म्हणाले साठ वर्षापूर्वी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार व व्ही. टी. पाटील यांच्या सान्निध्यात आपली जडणघडण झाली. कमवा व शिका योजनेतून आपले शिक्षण झाले. आप्पासाहेब पवार यांच्या पालकत्वामुळे आपले शिक्षण पूर्ण होऊ शकले असे स्पष्ट केले.

प्रास्ताविक बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयिका डॉ. प्रतिभा बी. देसाई यांनी केले. त्या म्हणाल्या बेटी बचाओ अभियान राबविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमामध्ये समाजातील प्रत्येक घटकांसाठी जनजागृती कार्यक्रम राबवून प्रबोधन केले आहे.

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे म्हणाले लेखक कुराडे यांनी लिहीलेली थोरामोठयांची चरित्रे जिज्ञासू वाचकांनी चिकित्सकपणे वाचली पाहिजे. कुराडे हे चैकस बुध्दीचे लेखक असून त्यांनी महिला सक्षमीकरणासह बेटी बचाओ अभियानपुरक कार्य केले आहे. त्यांच्या काही पुस्तकांची दुसरी आवृत्ती प्रसिध्दी होते यातून वाचक पसंती लक्षात येते.

कार्यक्रमास प्रा. जी. पी. माळी, हसन देसाई, सिध्दार्थ लाटकर, श्याम कुरळे, डॉ. प्रा. सुनील देसाई, अॅड. दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, एम.डी. देसाई, ईश्वर देसाई, मोहन कवटेकर, समाजशास्त्र अधिविभाप्रमुख डॉ. प्रतिमा पवार, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. ज्योती जाधव यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील आणि शिवराज संकुलातील शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. आभार युवराज कदम यांनी मानले. सुत्रसंचालन उज्वला पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??