ताज्या घडामोडीदेश विदेशविशेष

हिंदू धर्म : दोन वाटा, दोन अर्थ : भाजपचा भस्मासुर हिंदुधर्म संपवायला निघाला आहे असे शंकराचार्य का म्हणतात? – डॉ सुभाष के देसाई

हिंदू धर्म : दोन वाटा, दोन अर्थ


भाजपचा भस्मासुर हिंदुधर्म संपवायला निघाला आहे असे शंकराचार्य का म्हणतात?

डॉ सुभाष के देसाई


शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यांभोवती निर्माण झालेला वाद केवळ व्यक्तीविरोधापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या संलग्न संघटनांच्या विचारसरणीपर्यंत पोहोचतो आहे. प्रश्न असा उभा राहतो की संघाची राजकीय-सांस्कृतिक मांडणी ही मूळ हिंदू धर्माच्या, म्हणजेच सनातनाच्या आत्म्याशी सुसंगत आहे की विरोधात?आज हिंदू धर्म एका निर्णायक वळणावर उभा आहे. एकीकडे आरएसएस-प्रणीत, सत्ताकेंद्री हिंदुत्व आणि दुसरीकडे शंकराचार्य-प्रणीत, सनातनी व आध्यात्मिक हिंदू धर्म—अशा दोन स्पष्ट छकला पडलेल्या दिसत आहेत. हा वाद केवळ राजकीय नाही; तो श्रद्धा, परंपरा आणि विवेक यांचा आहे.

काशीबाबत “काशीशी जावे, नित्य वदावे” ही म्हण केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक जीवनदृष्टी व्यक्त करते. मणिकर्णिका व हरिश्चंद्र घाट, तेथील प्राचीन विधी, मृत्यूला उत्सवात रूपांतरित करणारी परंपरा—हे हिंदू धर्माचे गूढ तत्त्वज्ञान आहे. मी स्वतः दशकानुदशके काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले आहे. पूर्वी भक्त शिवलिंगाजवळ निवांत बसून अभिषेक, ध्यान करू शकत होता. आज ‘कॉरिडॉर’च्या नावाखाली आजूबाजूची मंदिरे पाडली गेली, घाटाशी जोडणी झाली, आणि श्रद्धेचे रूपांतर वेगवान, व्यापारी दर्शनात झाले. हा बदल केवळ भौतिक नाही; तो आध्यात्मिक ऱ्हासाचे लक्षण आहे.

प्रयागराजच्या कुंभमेळ्यांतही पूर्वी सत्ता आणि धर्म यांत संघर्ष नव्हता. मात्र मोदी सरकारच्या काळात संन्यास आणि सत्तेचे विचित्र संमीलन घडले. संन्यासी वस्त्रे धारण करून राजवैभव उपभोगणारा मुख्यमंत्री हा अनेक साधुसंतांच्या टीकेचा विषय ठरणे स्वाभाविक आहे. कारण सर्वसंगपरित्याग आणि राज्यकारभारातील घाणेरडे राजकारण—हे हिंदू धर्माच्या मूलतत्त्वांना विसंगत आहे. म्हणूनच “एकतर भगवी वस्त्रे काढून मुख्यमंत्रीपद भोगावे, किंवा आखाडा-परंपरेनुसार सत्तेचा त्याग करावा” ही मागणी शंकराचार्यांच्या सनातनी परंपरेशी सुसंगत ठरते.

काशीतील मणिकर्णिका घाटाचा विध्वंस करून तेथे आंतरराष्ट्रीय बसअड्ड्याचा विचार, शंकराचार्यांना पवित्र स्नानापासून रोखणे, त्यांच्या बैठकीची मोडतोड, शिष्य-संप्रदायांवर झालेली कथित मारहाण—या घटना केवळ प्रशासकीय चुकाच नाहीत; त्या धर्मावर सत्तेचे वर्चस्व लादण्याचे प्रतीक आहेत. त्यामुळेच शंकराचार्य विरुद्ध सरसंघचालक असा नवा संघर्ष उभा राहिला.

या पार्श्वभूमीवर एक भावना दृढ होत आहे—भाजपचा हिंदू धर्म हा बहुजनांचा हिंदू धर्म नाही. तो सत्तेसाठी धर्म वापरणारा आहे, तर शंकराचार्यांची भूमिका धर्मासाठी सत्तेला प्रश्न विचारणारी आहे. म्हणूनच सनातनी ब्राह्मणवर्गापुरता मर्यादित हिंदुत्व टिकू शकत नाही; बहुजन समाजाचा विवेक जागा झाला, तर तो शंकराचार्यांच्या भूमिकेकडे झुकतो.

मोदी-शाह यांना बहुजनांना “हिंदू धर्म शिकवण्याची” गरज नाही. कारण विवेकानंदांनी सांगितलेला, शाहू-फुले-आंबेडकरांनी सामाजिक न्यायाशी जोडलेला, आणि संविधानाने मूल्यरूप दिलेला हिंदू धर्म—तोच खरा बहुजनांचा हिंदू धर्म आहे. या वास्तवामुळेच भाजपच्या हिंदुत्वाचा मुखवटा उघड पडतो, आणि शिवसेनेतील प्रबोधनकार ठाकरेंची धर्माची मांडणी अधिक स्पष्ट, सोपी आणि नैतिक ठरते.



आजचा संघर्ष व्यक्तींचा नाही; तो हिंदू धर्माच्या आत्म्याचा आहे. सत्ता धर्माला गिळते की धर्म सत्तेला मर्यादा घालतो—हा प्रश्न इतिहास ठरवेल. पण एक निश्चित आहे: हिंदू धर्म एकरेषीय नाही; तो विवेक, संवाद आणि बहुजनांच्या अनुभूतीतूनच टिकून राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button